जनता दरबारनंतर ‘त्या’ पाच गावांची पाहणी

तिलारी ‘चे पाणी देण्यासाठी होणार प्रयत्न
प्रतिनिधी l दोडामार्ग
तिलारी परिसरातील मेढे, पाळये, सोनावल, केर आणि मोर्ले ५ गावांना धरणाचे पाणी देता येईल का याची चाचपणी करण्यासाठी तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी त्या गावांचा पाहणी दौरा केला. ओरोस येथे बुधवारी (ता.१४) झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाचही गावाच्या शिष्टमंडळाने पाण्याची मागणी केली होती.
पालकमंत्री चव्हाण यांनी त्यासंदर्भात तत्काळ सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकारी त्या गावात पोचले होते.
भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी ही माहिती दिली. मंत्री चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कसई – दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, केर – भेकुर्ली ग्रामपंचायत उपसरपंच तेजस देसाई यांनी या गावात तिलारी धरण आणि परिसरातील गावात पाण्याची गरज का आहे याबाबत चर्चा केली.
दरम्यान,कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्यासह अन्य अधिकारी शुक्रवारी (ता .१६) सकाळी तिलारीत पोहचले .सोबत भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तेरवण मेढे ग्रामपंचायत सदस्य मायकल लोबो आदी उपस्थित होते. श्री. दळवी यांनी केर चव्हाटा मंदिरच्या वरील भाग ते खरारी नदी पर्यंतचा परिसर सर्व्हे अधिकाऱ्यांना दाखवला.