“एकच वादा, जय हो दादा” भाजप पदाधिकाऱ्यांचा स्टेटस चर्चेत!

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी च्या पार्श्वभूमीवर स्टेटसला महत्त्व प्राप्त
नारायण राणेंचा स्टेटस ठेवल्यामुळे राणेंना उमेदवारी मिळण्याचे चर्चेला जोर
गेले काही दिवस सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा शिवसेना महायुतीचा उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरू असताना अनेक नावे चर्चेत आली. आता या चर्चेला अंतिम स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी लावलेला “एकच वादा जय हो दादा” हा स्टेटस सध्या चर्चेत आला आहे. एकीकडे नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीसाठी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार असतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र दुसरीकडे भाजपच्या गोटातून राणे यांच्या प्रकृती अभावी ते निवडणूक लढवणार नसलयाची ही चर्चा समोर येत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान या गाठीभेटी सुरू असताना किरण सामंत यांनी दोन वेळा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. मात्र राणे यांच्याकडून त्यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नव्हता. परंतु किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढविण्यास प्रचंड आग्रही आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदरची जागा ही भाजपा ची असल्याचा दावा केला होता. माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाव मध्यंतरी आघाडीवर असताना श्री जठार यांनी देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार असू शकतील असे वक्तव्य करून राजकीय सस्पेन्स वाढवला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस वेगवान घडामोडी घडत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काही मंत्र्यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावून “एकच वादा जय हो दादा” अशा स्टेटस लावल्याने आता हा स्टेटस म्हणजे राणेंची उमेदवारी फायनल झाली असं समजायचं का? तसे संकेत भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले गेलेत का? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान केंद्रीय भाजपा कडून अद्याप या नावावर जरी शिक्का मोर्तब झालेला नसला तरी लवकरच हे नाव फायनल होणार आहे. काही दिवसांपूर्वी मी राणे समर्थक अशा आशयाचा लागलेला स्टेटस व त्यानंतर असा राणेंचा फोटो लावून या निवडणुकीच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर “एकच वादा जय हो दादा” हा स्टेटस सध्या राजकीय घडामोडींचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. त्यामुळे आता नेमकी या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार असणार की भाजपा धक्का तंत्र वापरणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





