जिल्ह्यातील एका वित्तीय संस्थेच्या कार्यालयात धक्काबुक्की?

“मार्च एंड” च्या पार्श्वभूमीवर वसुलीच्या मुद्द्यावरून घडला प्रकार
“तो” राजकीय पदाधिकारी व संस्थाप्रमुख यांच्यातील “तो” प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग जिल्ह्याची व येथील कष्टकऱ्यांची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या एका वित्तीय संस्थेमध्ये काल गुरुवारी संस्थेच्या प्रमुखासोबत एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याची खडाजंगी झाली. यात या दोघांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचे समजते. जिल्ह्याचे मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीमध्ये झालेला हा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत उपलब्ध माहितीनुसार या संस्थे सोबत झालेल्या आर्थिक व्यवहारावरून ही खडाजंगी झाल्याची समजते. दरम्यान आर्थिक व्यवहारातील रक्कम वसुली करिता या संस्थेच्या प्रमुखांनी तगादा लावला. दरम्यान या संस्थेच्या एका कणकवली मधील शाखेमध्ये काहीतरी पाणी मुरत असल्याची बाब गेले काही दिवस चर्चेत होती. दरम्यान याबाबत एकावर कारवाई देखील झाली होती. या साऱ्यात या राजकीय पदाधिकाऱ्याशी एक संबंधित व्यक्ती देखील असल्याची चर्चा आहे. व या सर्व पार्श्वभूमीवर वसुलीच्या मुद्द्यावरून या संस्थेच्या कार्यालयात धक्काबुक्की झाल्याचे समजते. मार्च एन्ड च्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रकार चर्चेचा विषय असून, त्या वित्तीय संस्थेच्या प्रमुखांनी या सर्व प्रकारात घेतलेल्या वसुलीच्या भूमिकेबद्दल संस्था संचालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग