शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांचा तडका फडकी राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्यामुळे खळबळ
वरिष्ठ विश्वासात घेत नसल्याचा मसुरकर यांचा आरोप
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी आपल्या शहर प्रमुख या पदाचा तडका फडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे राजीनामा श्री. मसुरकर यांनी दिला आहे. कणकवली शहराचे शहर प्रमुख म्हणून मसुरकर कार्यरत होते. ठाकरे गटाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. सध्या श्री. मसूरकर हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत असताना वरिष्ठाकडून वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप श्री मसूरकर यांनी केला. शिवसेना संपर्कप्रमुख व तालुकाप्रमुख यांना देखील हे राजीनामा पत्र श्री मसुरकर यांनी दिले आहे. प्रमोदशेठ मसूरकर यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी देखील या निमित्ताने समोर आली असून वरिष्ठांवर केलेल्या आरोपाने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना डावलणारे ते वरिष्ठ कोण? असा देखील सवाल असा उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग
