नाधवडे परिसर शिवगर्जनेने दुमदुमला

महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
आजपासून ‘जाणता राजा’ महानाट्याला सुरुवात
सिंधुदुर्गनगरी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्गच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 मार्च दरम्यान वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे करण्यात आले आहे. महानाट्याच्या प्रयोगाच्या आज 18 मार्च रोजी पहिल्याच दिवशी नाधवडे शिवगर्जनेने दुमदुमले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री ,मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, अपर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बघण्याचा योग जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून “याची देही याची डोळा “आला. महानाट्यातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण,उत्तम वेशभूषा,सुसंगत प्रकाश योजना व सजावट उपस्थित रसिकांकडून महानाट्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते.





