मंदिर प्रवेश बंदी आणि ओटी गाऱ्हाणे भेदभाव एकजुटीने संपवून टाकू.
जनसेवा मंदिर प्रवेश आणि समानता समूह सिंधुदुर्ग यांचा निर्धार.
सावित्रीबाई फुले आणि अप्पासाहेब पटवर्धन यांना आदरांजली.
कणकवली/मयुर ठाकूर
सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात अनेक गावात आजही अनुसूचित जातींना मंदिर प्रवेश बंदी आहे तसेच त्यांच्या ओटी आणि गाऱ्हाणे वेगळ्या ठिकाणी केली जातात. ही कालबाह्य कुप्रथा आता समूळ नष्ट करायची वेळ आली आहे आणि सर्व समाजातील व्यक्तींनी मिळून ही कुप्रथा लवकरच संपवूया असा निर्धार जनसेवा मंदिर प्रवेश आणि समानता समूह सिंधुदुर्ग यांच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक जनसेवा प्रतिष्ठानचे डॉ संजीव लिंगवत तसेच डॉ सतीश पवार यांनी आयोजित केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ मनीषा नारकर आणि शुभांगी पवार यांच्या हस्ते राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून तसेच अप्पासाहेब पटवर्धन यांना आदरांजली वाहून केली गेली.
आजही मालवणी मुलखातील अनेक गावात अनुसूचित जातींना मंदिर प्रवेश बंदी आहे तसेच ओटी गाऱ्हाणे याबद्दल भेदभाव होत आहे, हे सत्य असल्याचे डॉ संजीव लिंगवत यांनी निदर्शनास आणून सर्व समाजाने ही कालबाह्य झालेली कुप्रथा संपवली पाहिजे असे प्रास्ताविक केले.
माणसाने माणसाला माणसासारखेच वागवावे , असे प्रतिपादन करून प्रा अजित कानशिडे यांनी मंदिरात भेदभाव होऊ नये यासाठी कायदे स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच झालेले आहेत, पण त्यांची अंमलबजावणी अजूनही होत नाही याबद्दल खेद व्यक्त केला. तर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यापेक्षा अन्याय करणाऱ्या लोकांनाच ही प्रथा लांच्छन आहे , असे मत व्यक्त डॉ सर्वेश नारकर यांनी केले.
मंदिरात येथे कोणताही जातीभेद होत नाही असा फलक सर्वांना दिसेल अशा रीतीने ठळक लावला गेला पाहिजे असे मत इंजि प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले. तर मानवातील उच्चनीचता ही अंधश्रद्धा असून तिचा बीमोड आपण सर्वांनी एकत्र येवून करुया असे मत विजय चौकेकर यांनी व्यक्त केले.
देवळात होणारा अन्याय हा अनुसूचित जातीच्या स्त्रियांना जास्त भोगावा लागतो , असे म्हणणे शुभांगी पवार यांनी मांडले. आम्ही गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांना या प्रथेच्या बिमोडासाठी पत्र पाठवत आहोत असे त्या म्हणाल्या. आता समाजाच्या अनेक थरातील माणसे यासाठी पुढे येत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार बाळा राणे, समाजभूषण प्रभाकर जाधव यांनी सुद्धा यावेळी आपले बहुमोल अनुभव पुढे ठेवले.
या प्रथेविरोधात आवाज उठवून अन्याय कर्त्यांचे मतपरिवर्तन होऊन ही कुप्रथा संपवण्यासाठी त्यांनी पुढे यावे यासाठी प्रयत्न करूया. अस्पृश्यता पाळणे हे मागासलेपणाचे लक्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा अप्रगतपणा नष्ट करुया असे एकमताने या बैठकीत ठरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक डॉ. संजीव लिंगवत यांनी तर डॉ. सतीश पवार यांनी आभार मांडले. शैलेश घाडी यांनी तांत्रिक सहाय्य केले. यावेळी जनसेवा मंदिर प्रवेश आणि समानता समन्वय समूह, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीला जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, डॉ सतीश पवार , प्रा.अजित कानशिडे , डॉ. मनीषा नारकर , डॉ सर्वेश नारकर , अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक श्री विजय चौकेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार विजेते श्री प्रभाकर जाधव, निवृत्त अभियंता प्रकाश चव्हाण , शैलेश घाडी, शुभांगी पवार, पत्रकार बाळा राणे आदी मान्यवर उपस्थित होते.