आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर

कणकवली : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे सन्मानाचे पुरस्कार सन २०२३-२४ साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी जाहीर करण्यात येत आहेत. त्यामध्ये वृंदा कांबळी, सुहास वरुणकर, सुप्रिया प्रभूमिराशी, सरिता पवार, प्रणिता बांबूळकर,अक्षय मेस्त्री, नितीन पाटील आणि श्रीकांत वनकुद्रे या मानवंतांचा समावेश आहे. यावेळी कै उमा महेश काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धेतील सर्वोत्तम विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी कलातपस्वी आप्पा काणेकर स्मृती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कथा,कादंबरी, ललित लेखनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आनंदयात्री वाड़मय मंडळाच्या संस्थापिका, ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका,कथालेखिका वृंदा कांबळी यांना साहित्य सेवा पुरस्कार, गेली अनेक वर्षे नाट्य, एकांकिका क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, रंगकर्मी सुहास वरुणकर यांना नाट्यसेवा दिग्दर्शक पुरस्कार, संगीत, लोककलांना पार्श्वगायन करणाऱ्या नवदुर्गा महिला भजन मंडळाच्या संस्थापिका, ज्येष्ठ संगीत विशारद शिक्षिका सुप्रिया प्रभूमिराशी यांना लोककला सेवा पुरस्कार तसेच कै.उमा काणेकर स्मृती शिक्षण क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण कार्य करणार्या शिक्षकांसाठी दरवर्षी देण्यात येणारा शिक्षण विषयक उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात गेली अनेक कार्य करणाऱ्या परिवर्तनवादी कवयित्री आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका सरिता पवार यांना तसेच विज्ञान विषयक विविध उपक्रमांत, विज्ञान प्रदर्शन, शोधनिबंध आदी विषयात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या प्रयोगशील शिक्षिका प्रणिता बांबूळकर या दोघांना उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार म्हणून चित्रकला क्षेत्राबरोबरच निसर्गप्रेम आणि पर्यावरण संतुलन राखत शेकडो पशु-पक्ष्यांना जीवनदान देवून त्यांच्या विधीतून बी रुजवून वृक्षसंवर्धनाचा आगळा प्रयोग करणारा अक्षय मेस्त्री यांना पशु-पक्षी जीवनदाता पुरस्कार तसेच आर्थिक क्षेत्रात सल्लागार म्हणून बरीच वर्षे काम करणारे शेअर मार्केट तज्ज्ञ आणि मार्गदर्शक नितीन पाटील यांना अर्थ व्यवस्थापन पुरस्कार आणि संगीत, कला प्रांतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कलासाधक श्रीकांत वनकुद्रे यांना संगीत सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.लवकरच या सर्व पुरस्कार विजेत्यांना कणकवली येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी कळविले आहे.





