अखेर आमदार वैभव नाईक यांच्या प्रश्नानंतर भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर

प्रति हेक्टरी 20 हजार नुसार 2 हेक्टर च्या मर्यादेत मिळणार प्रोत्साहन अनुदान

आमदार वैभव नाईक यांच्या यांनी वेधले होते विधानसभेत पुरवणी मागण्यादरम्यान लक्ष

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीक खरेदी करिता देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान अखेर मंजूर झाले आहे. प्रती हेक्टरी 20 हजार च्या नुसार 2 हेक्टर च्या मर्यादेत प्रती शेतकऱ्याला हे अनुदान दिले जाणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी नुकत्याच चालू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यादरम्यान राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी शासनाकडून करण्यात चे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना (यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी भात विक्री केलेले असो किंवा नसो) या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार च्या मर्यादेत हा लाभ देण्याबाबत आदेश शासनाने पारित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. गतवर्षी देखील त्यांनी हा प्रश्न मांडल्यानंतर या प्रकार बाबतची कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्या द्वारे याबाबत शासनाचे लक्ष वेधले होते व त्यानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ होणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना सातबारावर असलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार हा लाभ अनुज्ञेय असणार आहे. मात्र याकरिता संबंधित शेतकरी हा भात खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असण्याची आवश्यकता आहे. पणन हंगाम 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ही रक्कम अनुज्ञेय असणार असल्याची शासनाने म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!