कणकवली महाविद्यालयात १० फेब्रू.रोजी कोकण इतिहास परिषदेचे १३वे राष्ट्रीय अधिवेशन

कणकवली –
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाच्या वतीने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे बीजभाषक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक तथा त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि.ल.धारूरकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ संजय जगताप, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे सचिव श्री विजयकुमार वळंजू व शिक्षण प्रसारक मंडळ संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण भोसले, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम पाटील, दोडामार्ग येथील प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील कोल्हापूर, दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ.आर.एस.पारवे,मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बालाजी सुरवसे,कै. बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक कानडे, रुईया कॉलेज, मुंबई येथील डॉ.प्रदीप वाघमारे,मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. दयानंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन सत्रात १४० शोध निबंधांचे वाचन होणार असून प्राचीन विभागाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. संजय पाईकराव,मध्ययुगीन विभागाचे सत्राध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठातील डॉ. प्रकाश मसराम व आधुनिक विभागाचे सत्राध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राज ताडेराव मार्गदर्शन करणार आहेत.
कोकण इतिहास परिषदेच्या १३ व्या अधिवेशनानिमित्त एचपीसीएल सभागृहाच्या बाजूला मोडी लिपी कागदपत्रे, कातळ शिल्प छायाचित्रे व पुस्तक प्रदर्शने होत असून कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री सदाशिव टेटविलकर,कार्यवाह प्रा. विद्या प्रभू यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या वेळीं कोकण इतिहास परिषदेच्या वतीने चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री प्रकाश देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असून उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार ,उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार तसेच अधिवेशनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा, ऐतिहासिक रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धाचे बक्षिस वितरण होणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने कोकणातील इतिहास ,कला, साहित्य, संस्कृती ,विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, भूगोल, समाज जीवन,कृषी, पर्यटन अशा विविध विषयाचे संसोधन पुढे यावे या उद्देशाने
कणकवली महाविद्यालयाने काढलेल्या ” कनक ” या आंतरविद्याशाखीय शोध ग्रंथांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कोकणातील इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी नागरिक , प्राध्यापक, विद्यार्थ्यानी अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, परिषदेचे समन्वयक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बाळकृष्ण गावडे,ग्रामीण विकास विभाग डॉ.राजेंद्र मुंबरकर, भूगोल विभाग प्रमुख डॉ.बी. एल. राठोड तसेच डॉ.मारोती चव्हाण प्रा. सचिन दर्पे,प्रा. सत्यवान राणे, प्रा. तेजस जयकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!