रात्रो ९.३० नंतर वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक नियंत्रकांविनाप्रवाशांच्या गैरसोयीसह अपघात घडल्यास वाली कोण ? – भाई चव्हाण

कणकवली :– रा. प. महामंडळाच्या कारभारात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. मात्र अलिकडे आर्थिक बचत करण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग विभागातील काही स्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकांना रात्री हा कक्ष बंद करुन पहारेकऱ्यांच्या हातात किल्ली सुपुर्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीसह रस्त्यात एसटीला अपघात आदी घडल्यास वाली कोण असा प्रश्न कणकवली तालुका प्रवासी संघटनेचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महामंडळाला केला आहे.

राप महामंडळाकडून एका वाहतूक नियंत्रकाचे वेतन वाचावे यासाठी कणकवली, सावंतवाडी स्थानकांत रात्री अनुक्रमे ९.३० आणि ११ वाजता हे वाहतूक नियंत्रण कक्ष बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे या कर्मचार्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे हे कर्मचारी स्थानकांतील कार्यालयात झोपतात. पहाटे ५.३० वाजता उठून त्यांना पुन्हा कक्षात काम सुरू करावे लागते. तोपर्यंत मधल्या काळात फारशी माहिती नसलेल्या स्थानकातील खाजगी पहारेकर्यांवर स्थानकाची जबाबदारी सोपविली जाते. स्थानकात रात्रो प्रवाशांसह काही मद्यपी झोपतात. तर काही गुन्हेगारांची रेलचेल असते, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, कणकवली स्थानकात तर रात्री ९.३० ते पहाटे ५.३० या कालावधीत एसटीच्या १० ते १२ गाड्यांची ये-जा सुरू असते. या गाड्या स्थानकात दाखल झाल्याची नोंद न होता त्या रवाना होतात. या दरम्यान एकाद्या गाडी बिघडली अथवा दुर्दैवाने अपघातग्रस्त झाली तर त्याला वाली कोण असा प्रश्न कर्मचारी आणि प्रवासी वर्गांकडून विचारला जात आहे.

रात्रीच्या लांब पल्ल्याच्या मुंबई ,पुणे, धाराशिव आदी गाड्या कणकवली स्थानकांतील उपहारगृह सायंकाळी बंद होत असल्याने खाजगी हाॅटेल मध्ये जेवणासाठी थांबविल्या जातात. त्यामुळे कणकवली स्थानकात नियोजित वेळेपेक्षा उशीरा पोहचतात. कक्ष बंद असल्याने प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना अपेक्षित माहिती मिळत नाही. कणकवली स्थानकातील दुरध्वनीही बेभरवंशीपणे चालत असल्याने प्रवाशांना अपेक्षित माहिती मिळत नाही. दुसर्या दिवशीच्या प्रवासाला निघणारे प्रवाशी स्थानकात चौकशीसाठी रात्रो उशीरा येतात. त्यांचीही कुंचबना होते, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, राप महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. त्यामुळे हे वाहतूक नियंत्रण कक्ष पुर्वीप्रमाणेच रात्री चालू ठेवावेत, अशी मागणी कर्मचार्यांसह प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!