खारेपाटण येथे सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

७०० पेक्षा अधिक सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत खारेपाटण येथे स्नेहमेळावा संपन्न

खारेपाटण दशक्रोशीतील समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या हाताला रोजगार देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी खारेपाटण हायस्कूल येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बांधवांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.
खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात श्री रमाकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी गट विकास अधिकारी वासुदेव नाईक,बिझनेस पीपल संस्था सांगली चे स्वप्नील पाटील, नडगिवे सरपंच सौ.माधवी मण्यार,वायगणी सरपंच सौ अस्मी लाड,उपसरपंच प्रताप फाटक, कुरगावणे – बेर्ले ग्रामपंचायत उपसरपंच बबलू पवार,माजी सरपंच बाळा राऊत,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,किरण कर्ले, खारेपाटण तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत,खारेपाटण सोसायटी संचालक विजय देसाई,खारेपाटण पतपेढी संचालक भावेश कर्ले, खारेपाटण सकल मराठा समाज बांधव समिती उपाध्यक्ष अरविंद कर्ले,श्रीकांत भालेकर,सहसचिव सुबोध देसाई, चिंचवली अध्यक्ष बळीराम भालेकर, कुरगवणे अध्यक्ष सूर्यकांत पवार, वायगणी अध्यक्ष प्रमोद जाधव,शेर्पे अध्यक्ष धनराज शेलार,बेर्ले अध्यक्ष रतन राऊत,नडगिवे अध्यक्ष चंद्रकांत मण्यार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या शूभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.उपस्थित सर्व मान्यवरांचे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधवांमधील इयत्ता १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थी,शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, पोलीस पाटील,तंटामुक्ती समिती अध्यक्ष या सर्वांचा सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.तर सकल मराठा समाज बांधव फलकाचे अनावरण देखील यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बिझनेस पीपल संस्थेचे श्री स्वप्नील पाटील यांनी सारथी योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, बेरोजगार युवक युवतींना कसे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
तर सावंतवाडी गट विकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांनी समाजातील बेरोजगार तरुणांनी एकत्र येत उद्योगशिल बनून आपल्या स्वतःच्या विकासा बरोबरच समाजाच्या विकासाला देखील हातभार लावला पाहिजे.असे मत मांडले.यावेळी वायगणी सरपंच सौ अस्मि लाड यांनी देखील मराठा समाजाच्या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने महिला सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये अगदी लहना पासून मोठ्यापर्यंत सर्व स्तरातील महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आला. या मेळाव्यातून समाजाला परिवर्तनशिल वाटेकडे नेण्याचे काम सकल मराठा समाज करत असल्याचे सचिव ऋषिकेश जाधव यांनी सांगितले
खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधवांच्या या स्नेहमेळाव्यात महिला वर्गाची उपस्थित सर्वात जास्त होती.एकूण ७०० पेक्षा अधिक सकल मराठा समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री जगदीश सावंत यांनी केले तर सर्वांचे आभार श्री ऋषिकेश जाधव यांनी मानले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!