रस्त्यावरच्या चुकीला माफी नाही;रस्ता सुरक्षा अभियानाचे घोडावत विद्यापीठात उदघाटन

अतिग्रे :संजय घोडावत विद्यापीठात रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उदघाटन सोमवार दि. 15 जानेवारी रोजी झाले.रस्ते अपघात होऊ नयेत यासाठी जनजागृतीचा हा कार्यक्रम एक महिना सुरू राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षी 416 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. यामध्ये हातकणंगले-शिरोळ भागातील प्रमाण जास्त आहे.तसेच 40 जणांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याचे सांगत त्यांनी अपघात होऊ नये यासाठी रस्त्याची शिस्त अंगीकारण्याचा सल्ला दिला.
इचलकरंजीचे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत जिल्ह्यातील खुनाच्या चारपट संख्या अपघातग्रस्तांची असल्याची माहिती दिली.त्यामध्ये युवकांची संख्या जास्त असल्याबद्दल हळहळ व्यक्त केली. अपघात होऊ नये यासाठी स्वयंशिस्त महत्वाची अन्यथा रस्त्यावरच्या चुकीला माफी नाही असा इशारा विद्यार्थ्यांना दिला.
विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला हे अभियान राबवण्यासाठी संजय घोडावत सोशल फाउंडेशन व विद्यापीठ सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट बंधनकारक करण्याचा घोडावत विद्यापीठ विचार करेल अशी ग्वाही दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर व विजय इंगवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवाजी पाटील, घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. चेतन पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.