कुडाळदेशकर भवनचे काम लवकरच सुरू होणार

कुडाळ, प्रतिनिधी
मागील अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेले कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांचे स्वप्न कुडाळदेशकर भवनाच्या रूपात लवकरच साकारणार आहे. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे कुडाळदेशकर भवन उभारले जाणार असल्याची घोषणा कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजीत देसाई यांनी “स्नेहबंध २०२४” या कार्यक्रमादरम्यान दिली. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दोन दिवसीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन कुडाळ एमआयडीसी येथे करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उमाकांत सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गौड ब्राह्मण सभा गिरगावचे अध्यक्ष जगदीश वालावलकर, मेंगलोर संस्थेचे प्रमुख शिवानंद प्रभू, ज्येष्ठ पत्रकार संजीवनी देसाई, कणकवली मंडळाचे अध्यक्ष सुरेश सामंत, बेळगाव मंडळाचे प्रमुख श्रीकांत आजगावकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देसाई, सचिव प्रशांत धोंड आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व श्रीमत पूर्णानंद स्वामींच्या प्रतिमेला तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सर्वच मान्यवरांनी कुडाळदेशकर युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या कामाचे कौतुक करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांना एकत्र करण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना अध्यक्ष रणजीत देसाई यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात भव्य असे कुडाळदेशकर भवन उभारले जाणार असल्याबाबत सुतवाच केले. यासाठी जागा उपलब्ध झालेली असून लवकरच भव्य असा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे असे सांगितले. तसेच ज्ञातीमधील विद्यार्थी आणि विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा देखील दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याबाबत सांगितले. यावर्षीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रसिद्ध निवेदक व गायक प्रफुल वालावलकर यांना प्रदान करण्यात आला. तर विशेष पुरस्कार अमृता उमेश गाळवणकर यांना देण्यात आला.
त्यानंतर ‘स्वरसंध्या’ या ज्ञातीतील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध गायक प्रसन्न प्रभूतेंडुलकर, ऋषिकेश देसाई, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, डॉ. तेजस्विनी देसाई, मधुरा खानोलकर, ज्योती देसाई व सलोनी खानोलकर यांनी सुमधुर गीते सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
तसेच स्वरांगी खानोलकर हिच्या भरतनाट्यम शैलीतील गणेश वंदना व अनेक महिलांनी सामूहिक सणी वैयक्तिक नृत्यांनी कार्यक्रमात बहार आणली. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळदेशकर ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.