विचारांचे मकर संक्रमण: सिंधुदुर्ग महाविद्यालयाची वर्ग सजावट स्पर्धा संपन्नविज्ञान शाखा विभागाने पटकावले विजेतेपद

सूर्याचे उत्तरायण सुरु होते तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा. तिळगुळ वाटून स्नेहाचे वर्धन करण्याचा हा दिवस मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात गेली १३ वर्षे अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय. दरवर्षी संक्रांतीच्या वेळी सांस्कृतिक विभाग आणि जिमखाना विभाग यांच्या वतीने सर्व वर्गाना विविध संकल्पना दिल्या जातात, प्रत्येक वर्ग एक संकल्पना निवडून त्या विषयावर विविध माध्यमांचा वापर करत आपल्या वर्गाची सजावट करतो आणि ठरलेल्या दिवशी प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आपल्या संकल्पनेचे सादरीकरण करतात, परीक्षक त्याचे परीक्षण करतात, विविध प्रश्न विचारतात, असे या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे स्वरूप आहे. या चौदाव्या वर्षी ही वर्ग सजावट स्पर्धा आणि तिळगुळ समारंभ दिनांक १५ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व वर्गानी रांगोळी, पोस्टर्स, चित्रे, तक्ते, सुलेखन, फलक लेखन, प्रदर्शन या सर्व माध्यमांचा वापर करत यंदाची स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेत आपल्या वर्गांची सजावट केली होती. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उर्मिला मेस्त्री, प्रा. अनुराधा गावडे, प्रा. हर्षदा धामापूरकर यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. प्रथम क्रमांक – विज्ञान विभाग: संकल्पना अंतराळ संशोधन व विकास; द्वितीय क्रमांक द्वितीय वर्ष कला शाखा: संकल्पना अंतराळ संशोधन व विकास; तृतीय क्रमांक तृतीय वर्ष वाणिज्य: संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारत: उत्तेजनार्थ – प्रथम वर्ष कला शाखा संकल्पना: जत्रा आणि संस्कृती; उत्तेजनार्थ – तृतीय वर्ष कला शाखा संकल्पना: प्रादेशिक भाषा आणि त्यांचे जतन. याचबरोबर द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संकल्पनेवर आधारित सजावट केली होती. तर प्रथम वर्ष वाणिज्य शाखेने अंतराळ संशोधन व विकास या विषयावरील सजावट केली होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वमेहनतीने आपले वर्ग रंगवून तिथे सर्व सजावट केली होती. यातील सर्व चित्रे, रांगोळ्या आणि पोस्टर्स लक्षवेधी ठरली.
प्रत्येक वर्गात जाऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर, सर्व परीक्षक आणि सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वर्ग यांनी सर्वांची सादरीकरणे व सजावट पाहिली. सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम सकपाळ, दत्ता मालाडकर, सिल्वी डान्टस, आकाश तावडे, तेजस कातवणकर, योगिता लब्दे, शुभम पवार, अमोल घाडी, सौरभ चव्हाण, निकिता शर्मा, महेक शेख, चैत्राली मेस्त्री, कुणाल बिरमोळे, मेगल डिसोझा, मुस्कान सोलकर, ओंकार कुबल, उत्तम पडते, मयुरेश चव्हाण, श्रावणी गावडे, राहुल जाधव, वैष्णवी गावडे, अर्पिता पालव, प्रणाली बांदेकर, हर्षाली कांदळगावकर, यांचा समावेश होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्वाना गुलाबफुले देऊन प्रत्येक वर्गात स्वागत केले आणि स्नेहाचे प्रतीक म्हणजेच तिळगूळ देण्यात आला. या वेळी प्राचार्यांनी सर्व विजेत्या वर्गांतील विद्यार्थ्यांचे आणि सहभागी वर्गांतील विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांचे आणि सृजनशीलतेचे कौतुक केले. तसेच हे मकर संक्रमण म्हणजे आपल्या महाविद्यालयात विविध संकल्पनाविषयक विचारांच्या संक्रमण स्वरुपात साजरे केले जाते आहे, असे कौतुकोद्गार काढले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उज्वला सामंत आणि जिमखाना विभाग प्रमुख डॉ. एच. एम. चौगले, स्पर्धा संयोजक डॉ. डी. व्ही. हारगिले, डॉ. सुमेधा नाईक, प्रणिता गोसावी, प्रेरणा शेलटकर, मुस्कान सोलकर, गीतेश वळंजू यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या स्वरूपाविषयी मार्गदर्शन केले. याच बरोबर महाविद्यालयात वार्षिक युवा महोत्सव ARTSIO 2023-24 मधील पहिला कार्यक्रम साडी डे देखील साजरा करण्यात आला. त्या मध्ये सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

मालवण(प्रतिनिधी)

error: Content is protected !!