राणेंनी भाजप मधली आपली “पत” दाखवावी!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे राणेंना आव्हान
खासदार विनायक राऊत यांच्या मताधिक्या साठी युवासेना चा गाव दौरा
केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामधून झालेल्या प्रमुख कामांसह खासदार विनायक राऊत यांनी या मतदार संघाच्या विकासासाठी केलेल्या कामाच्या अनुषंगाने कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये गाव दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, फरीद काझी, समन्वयक तेजस राणे, गुरू पेडणेकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, प्रकाश वाघेरकर, सचिन पवार, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, प्रतिक रासम, चेतन गुरव, विभागप्रमुख सिद्धेश राणे, किरण वर्दम, बबन मुणगेकर, सोहम वाळके, जिल्हासमन्वयक राजू राठोड आदि उपस्थित होते. निर्धार मताधिक्याचा गाव दौरा सुसंवादाचा अशा आशियाखाली हा गाव दौरा आयोजित करण्यात आला आहे. या गाव दौऱ्याच्या निमित्ताने प्रचार यंत्रणा तयार करण्यात येणार असून, ज्या ठिकाणी युवा सेना किंवा ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी नसतील तेथे पदाधिकारी देखील नेमले जाणार आहेत. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामाची पत्रके ही जनतेपर्यंत वाटली जाणार असून या माध्यमातून जनतेपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे काम पोचविले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महामार्ग चौपदरीकरणाचे 90 टक्के पूर्ण झालेले काम व बहुतांशी प्रमाणात वाटप झालेल्या मोबदला, चिपी विमानतळ, मराठा आरक्षण, कोकण रेल्वे विद्युतीकरण, वैद्यकीय महाविद्यालय हे प्रश्न आमदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बॅच सुरू देखील झाल्या आहेत. कोकणातील नानार, बारसु विनाशकारी प्रकल्पांना खासदार विनायक राउत यांनी विरोध केला व त्यांची भूमिका आजही तशीच राहिली आहे. या उलट येथील आमदार नितेश राणेंनी विजयदुर्ग रामेश्वर मध्ये घंटानाद आंदोलन छेडले होते. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची ही भूमिका बदलली. राऊत यांनी मात्र सुरुवातीपासूनच विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधी भूमिका घेतली व ते ठाम राहिले. घोडगे, सोनवडे घाट रस्त्याचे काम दृष्टी पंथात असून आंगणेवाडी येथील धरण प्रकल्पासाठी खासदार राऊत यानी 22 कोटी रुपयांचा निधी आणला. बीएसएनएल टॉवरचा सर्वात मोठा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी सोडवला. 260 टॉवरची काम त्यांनी मंजूर केली असून 67 टॉवरची कामे दृष्टीक्षेपात आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्या, हत्ती पकड प्रकल्प या कामांमध्ये खासदार विनायक राऊत हे नेहमीच सक्रिय व अग्रभागी राहिले आहेत. या मतदारसंघातील 2200 गावांमधील 90% गावांमध्ये पोचणारे एकमेव खासदार अशी विनायक राऊत यांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोचरी माचाळ या 3 हजार फूट उंच असलेल्या गावातही खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता करून घेतला. मागच्या निवडणुकीत 1 लाख 50 हजार 660 मतांपैकी आमदार नितेश राणेंना ८४ हजार ५०४ मते मिळाली होती. तर आमचे शिवसेनेचे सतीश सावंत उमेदवार होते त्यांना 56 हजार 388 मते मिळाली होती. जवळपास 28 हजार 116 मतांचे लीड नितेश राणेंना त्यावेळी मिळाले होते. मात्र हे मताधिक्य तोडत कमीत कमी 10 हजारांची मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना मिळवून देण्याचा निर्धार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. या मतदारसंघात आमची 7 लाख मते असल्याचा दावा नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी केला भाजपाचा या मतदारसंघावर दावा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र माझे राणेंना आव्हान आहे भाजपामध्ये जर राणेंची पत असेल तर त्यांनी या मतदारसंघांमध्ये कमळ चिन्हाचा उमेदवार द्यावा. त्यानिमित्ताने राणेंची भाजपामध्ये पत त्यांना कळून चुकेल असा टोला देखील नाईक यांनी लागावला. या लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार विनायक राऊत यांना आम्ही 2 लाखांचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल झालेली सी आर्म मशीन चे श्रेय हे युवा सेनेचे असून युवा सेनेने केलेल्या आंदोलनामुळे ही मशीन उपजिल्हा रुग्णालयात आली. ह्या मशीनचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा दाखवता तसेच राणेंनी इतरही विषयांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवावी असा टोला नाईक यांनी लगावला.
कणकवली /प्रतिनिधी