कणकवली भाजी मार्केट बाबत तातडीने निर्णय घ्या!

कणकवली शहरातील व्यापारी संघटनेकडून आमदार नितेश राणेंना विविध प्रश्नी निवेदन

व्यापारी भवन साठी शासकीय जागा द्या!

राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कणकवली उड्डाण पुलाखालील अनधिकृत व्यवसाय केंद्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हटविली आणि कणकवली व्यापारी संघाला परिपूर्ण व्यवसाय करता यावा असे सकारात्मक पाऊल उचलले होते. मात्र कणकवली शहरातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून याबाबत आपल्या स्तरावरून व्यापारी संघटनेला दिलासादायक निर्णय घ्यावा अशी मागणी कणकवली व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनात व्यापारी संघटनेने म्हटले आहे, बाहेरील गांव, शहर, पेठा या मधील व्यापारी कणकवली नगरपंचायत परिसरात येऊन कमी दर्जाचा व वजनातही कमी मालाची विक्री करतात त्या संदर्भात दिलासा मिळावा. नगरपंचायत परिसरात फिरते विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. यावर तोडगा निघावा. ग्रामीण भागातून येणाऱ्या विक्रेत्यांना सोईचे व्हावे म्हणून आपल्या पुढाकाराने २-३ वेळा गावठी आठवडा बाजार संकल्पना राबविली गेली, पण योग्य नियोजनाअभावी ती मृतवत झाली. कृषि उत्पन्न बाजारपेठेच्या माध्यमातून अशी योजना कार्यान्वित झाली तर त्याचा लाभ पेठेला होईल. कणकवलीचा भाजी मार्केटचा प्रश्न सुमारे २० वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे शहराला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त होते यावर तातडीची कारवाई अपेक्षित. बाजारपेठेत येणा-या ग्राहकांच्या सोईसाठी २ किंवा ३ वाहनतळ (जरुर असल्यास पे अँड पार्क) निर्माण करण्यात यावेत. कणकवली रा.प. बसस्थानक वगळता दाट वस्ती व २ ते ३ लाखांचे फ्लोटिंग पॉप्युलेशन असूनही स्वच्छता गृहे उपलब्ध नाहीत, ती व्हावीत, कणकवलीत २० वर्षापूर्वी एक दिशा मार्गाची अधिकृत अंमलबजावणी झाली परंतु गेले काही दिवस त्यात शिथीलता आली आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरा जोडणी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नगरपंचायत हद्दीत व्यापारी भवन उभारणीसाठी ४ ते ५ गुंठे शासकीय आरक्षित जमीन उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. कणकवली व्यापारीसंघ ही नोंदणीकृत संस्था असून जिल्हयाच्या मध्यवर्ती सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक, वैद्यकिय कणकवलीचा वारसा जोपासण्यासाठी शासन व प्रशासनाला कायम सहकार्याचा हात देण्याचे वचन देत असल्याचे या अर्जात म्हटले आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुरभा गावकर, सुशील पारकर, अशोक करंबेळकर, राजू पारकर, विलास कोरगावकर, राजेश राज्याध्यक्ष, नंदू उबाळे आणि उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!