आजपासून कणकवलीत भरणार पर्यटनाचा महामेळा!

कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
सोहळा आनंदाचा, आपुलकीचा, माणुसकीचा महोत्सव कणकवलीचा
माजी नगराध्यक्ष व सहकाऱ्यां कडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा
सत्ता असो वा नसो, नेहमीच कणकवली करांच्या सेवेत राहणाऱ्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व त्यांच्या सहकारी माजी नगरसेवकांच्या तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून आज 11 जानेवारी रात्री पासून कणकवली पर्यटन महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ होत आहे. सोहळा आनंदाचा, आपुलकीचा, माणुसकीचा, महोत्सव कणकवलीचा या टॅगलाईन खाली होणारा हा महोत्सव म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत भरगच्च कार्यक्रम व भाजपचे राज्य, देश स्तरावरील नेते यावेळी कणकवलीत दाखल होणार आहेत. दरम्यान या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, महोत्सवाच्या तयारी आढावा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख महेश सावंत, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, सामाजिक कार्यकर्ते राजू गवाणकर, राजा पाटकर, मनीष पेडणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. या पर्यटन महोत्सव च्या निमित्ताने भव्य दिव्य व्यासपीठासोबतच अनेक स्टॉल असणार आहेत. जेणेकरून येथे आलेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांसह नवनवीन वस्तू देखील खरेदी करता येणार आहेत. जेणेकरून पर्यटना करिता गेल्यानंतर एक वेगळी अनुभूती पर्यटकांना येते तशीच अनुभूती या महोत्सवानिमित्त पर्यटकांना घेता येणार आहे. तसेच हिंदी मराठी गाण्यांचे टॉप कलाकार कणकवलीत यानिमित्ताने येत असून हिंदी मराठी कलाकारांच्या गाण्यांचा जलवा येथे कणकवलीकरां सह जिल्हा वासीयांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, “महोत्सव कणकवलीचा” खऱ्या अर्थाने साकार होण्यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची सहकारी टीम मेहनत घेत आहेत. आज रात्री 9 वाजता या पर्यटन महत्त्वाचे औपचारिक उद्घाटन होणार असून तत्पूर्वीपासून नियोजित कार्यक्रम पार पडणार आहेत.कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्याचे बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन रात्री 9 वाजता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रात्री 8 वाजता शशांक कल्याणकर यांचा नामांकित ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे. यावेळी हास्य कलाकार फु बाई फु फेम सागर करांडे, हेमांगी कवी यांची उपस्थिती असणार आहे. 12 जानेवारी रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व सुहास वरूनकर व हरिभाऊ भिसे हे करणार आहेत. स्थानीक कलाकारांना यानिमित्ताने वाव मिळणार आहे. 13 जानेवारी रोजी इंडियन आयडॉल ची टीम येणार आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला इंडियन आयडॉल सायली कांबळे, आशिष कुलकर्णी व निहाल तवरो, यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. तर समारोपादिवशी 14 जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप रात्री 9 वाजता केला जाणार आहे. तत्पूर्वी रोजी प्लेबॅक सिंगर दिव्य कुमार, नचिकेत लेले, चेतना भारद्वाज व संचिता गर्गे यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दिगंबर वालावलकर/ कणकवली