विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

मोदी सरकार हे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे सरकार

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या प्रवासात आम्हाला देशातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून ‘ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटीवाली गाडी’ आहे . या यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून जे लोक विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत ,त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी ही यात्रा सुरू आहे.देशभरात प्रत्येक गावात ही यात्रा पोहोचणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सावंतवाडी या ठिकाणी पत्रकार परिषदेत दिली.

आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग दौऱ्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रथमेश तेली, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, पंतप्रधान मोंदींनी विविध लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून तसेच संकल्प यात्रा व ‘मन की बात ‘ या मधून जनतेसोबत ज्या प्रकारे संबंध तयार केले आहेत व प्रत्यक्ष संवादातून ज्या प्रकारचं नातं निर्माण केलं आहे त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्याप्रती विश्वास वाढला आहे. जनतेचा हाच विश्वास दृढ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जेव्हा २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी या सरकारसमोर जी मोठी आव्हानं होती त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील जनतेच्या प्रमुख गरजा पूर्ण करणे आणि त्यांच्या जीवनात एक सकारात्मक व चांगलं परिवर्तन घडवून आणणे. जेणेकरून त्यांना सुख प्राप्त होईल व एक चांगलं जीवन जगण्याची उमेद वाढेल. त्या दृष्टीने मागील साडे नऊ वर्षांमध्ये आम्ही प्रत्येक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. जसं की लोकांना घर देणं, प्रत्येक घरात शौचालय, गावातील प्रत्येक घरापर्यंत वीज जोडणी, ८० कोटी लोकांना अन्नधान्य वितरण, उज्वला गॅस कनेक्शन अशा विविध योजना आम्ही राबविल्या.

पूर्ण देशात ४ कोटी घरे, ११ कोटी पेक्षा जास्त शौचालये, १० कोटीहून अधिक उज्वला गॅस कनेक्शन दिले आहेत. प्रत्येक गावात वीज जोडणी तसेच प्रत्येक गावात पक्के रस्ते बांधले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, रेल्वे, एअरपोर्ट याच बरोबर मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज व डीग्री कॉलेज अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे.

त्यामुळे आमचा पहिलं उद्दिष्ट हे आहे की गेल्या साडेनऊ वर्षात आमच्या सरकारने ही जी काही कामे केलेली आहेत. ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहेत की नाहीत व पोहोचली असतील तर त्याचा प्रभाव जनतेवर काय पडला आहे हे पाहणं हाच या विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. तर दुसरा उद्देश असा आहे की या विकासाच्या प्रक्रियेत जे लोक बाकी आहेत त्यांच्यापर्यंत विकास पोहोचलेला नाही किंवा त्यांना विकासाची आवश्यकता आहे त्यांच्या पर्यंत देखील आमचे सरकारचे सर्व अधिकारी जात आहेत आणि त्यांना सरकारच्या सर्व योजनांबाबत गावागावात जाऊन माहिती दिली जात आहे. ज्यांना वाटत आहे की आम्ही एखाद्या योजनेसाठी पात्र आहोत मात्र त्याला त्याचा लाभ मिळाला नाही त्यांनी आवश्यक बाबी पूर्ण करून त्या योजनेचा लाभ घ्यावा. जेणेकरून या सर्व योजनांचा लाभ प्रत्येकासाठी होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या विकसित भारत यात्रेचा तिसरा व महत्त्वपूर्ण उद्देश हा आहे की देश फार मोठ्या गतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विकासाच्या या प्रक्रियेत देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन देशाच्या विकासासाठी स्वतःचा हातभार लावावा हा देखील आमचा प्रयत्न आहे.यासाठीच ही विकसित भारत संकल्प यात्रा प्रत्येक गावात जात आहे. या यात्रेत गावागावात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून देशाच्या विकासासाठी जोडण्याची शपथ घेत आहेत. असे सागितले.

प्रतिनिधी, सावंतवाडी

error: Content is protected !!