तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण?

राजकीय लोकप्रतिनिधीला निमंत्रण दिल्यावरून वाद?
घटनेची तालुक्यातील शिक्षण वर्तुळात जोरदार चर्चा
कणकवली तालुक्यात घाटपायथ्या लगत असलेल्या एका गावामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान राजकीय लोकप्रतिनिधी ला दिलेल्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात एका शिक्षकाला मारहाण झाल्याची चर्चा तालुक्यातील शिक्षण वर्तुळात सुरू आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असल्याची समजते. या दरम्यान तो शिक्षक ग्रामस्थांशी उलट – सुलट बोलल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. याबाबत मारहाण करणारे एका पक्षाचे तर सदरचा कार्यक्रम आयोजित करणारे हे दुसऱ्या पक्षाचे समर्थक असल्याने या दोघांमधील झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.कालपासून या बाबत “त्या” गावामध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान या निमंत्रण नाट्य वरून वाद सुरू झाल्यानंतर नियोजन समिती व ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादी झाल्यावर अखेर नियोजन समितीकडून सदर कार्यक्रम अ राजकीय कार्यक्रम असल्याचे लेखी देखील देण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान एका वास्तूचे लोकार्पण करत असताना त्याकरिता काही प्रमाणात लोकवर्गणीतून केलेल्या कामाच्या लोकार्पणाला कुणाही राजकीय व्यक्तीला बोलवायचे नाही असा मुद्दा चर्चेत असताना या कार्यक्रमाला एका लोकप्रतिनिधीला बोलावल्याने यातून वाद घडल्याचे समजते. परंतु याबाबत दोन्ही बाजूने असा प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला. असला तरी एका गटाकडून दबक्या आवाजात याला दुजोरा दिला गेला. दरम्यान शिक्षकाला मारहाण झाल्याची कुजबुज ही शिक्षण वर्तुळात सुरू असताना याबाबत आता तक्रार दाखल होणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर तेथील नियोजित कार्यक्रम देखील झाल्याचे समजते.
दिगंबर वालावलकर /कणकवली