प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको…

एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट
युपीआय, क्युआर कोड, सुविधा उपलब्ध
एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकिट इश्यू मशिन्स (ETIM)नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे.
मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने रा.प. महामंडळास सर्व वाहकांसाठी नवीन ॲण्ड्राईड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकिट मशीन्स घेण्यात आल्या आहेत.
सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे, डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोनपे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंट साठी वाहकाकडे असलेल्या ॲड्राईड तिकीट मशीन वर असलेल्या क्युआर कोड द्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटी ने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकतो.
युपीआय पेमेंट द्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी