कोकणातील जनतेला सक्षम करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध;विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

श्रीवर्धन – कोकणातील जनतेला सक्षम करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून त्यासाठी तुमचा आशिर्वाद, सहकार्य हवे आहे. तुमच्या विकासकामांना निधी कुठे कमी पडू देणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीवर्धन येथील जाहीर सभेत दिला.

या रायगड भूमीत आल्यावर मला एक वेगळी प्रेरणा मिळते. रायगडच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने पहिला छत्रपती देण्याचे काम केले आहे. भारताचा इतिहास बदलणारा स्वराज्यभिषेक इथे घडला असेही अजित पवार म्हणाले.

कोकणातील माझा शेतकरी कर्ज जास्त घेत नाही. कोकणाला समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे इथे पर्यटनाला जास्त महत्व दिले पाहिजे. राज्याची आर्थिक तिजोरी माझ्याकडे सोपवली त्यामुळे निधी देण्याची तयारी असते. जेवणाची पंगत बसताना वाढपी ओळखीचा असला पाहिजे तर पोटभर मिळते असेही मिश्किलपणे अजित पवार म्हणाले.

मुंबई- गोवा महामार्ग यावर्षी पूर्ण होईल अशी व्यवस्था नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून आम्ही केली आहे. रेवस – रेड्डी महामार्ग करताना खरी ओळख असणारी पर्यटन स्थळे आली पाहिजे असे अदिती तटकरे यांनी सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यासाठी लागणारा निधी वाढला तरी चालेल सांगितल्यावर तो निधी वाढवून मिळणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

शाहू- फुले – आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जात सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणार आहोत. शेवटी आपण भारतीय आहोत असेही अजित पवार म्हणाले.

२२ कोटी ७३ लाख रुपयांची योजना श्रीवर्धनकरांना देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत चार वेळा चक्रीवादळाने नुकसान झाले. त्यामुळे बरेच नुकसान झाले. वीजेचा त्रास सहन करावा लागला होता. आता कोकण विभागात भूमीगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणाचं कुठलंही काम असले तरी मी ते लगेच करतो. बाबांनो तुमच्या कामांना पैसा कमी पडू देणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

राजकारणात ३२ वर्षे काम करत आहे. अनेक पदे भोगली आहेत. मला खोटं बोलता येत नाही मात्र काही लोकं खोटं बोलून दिशाभूल करत आहेत असा टोलाही अजित पवार यांनी नाव न घेता लगावला.

केंद्रसरकारची मदत घेऊन आपलं राज्य एक नंबरला कसे राहिल यासाठी प्रयत्न करत आहोत. आज अनेक विकासकामे राज्यात सुरु आहेत .अनेक योजना सुरू आहेत. महिलांना ५० टक्के एसटीत सवलत दिली आहे.
७ डिसेंबरला पुरवण्या मागण्या सादर करणार आहे. विकासात कुठला घटक बाजूला रहाता कामा नये असा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झाला आहे. प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे मात्र एखाद्याला दिलेला घास काढून घ्यायचा अधिकार कुणाला नाही. उलट आपल्या ताटातील घास देण्याची परंपरा आहे. कुणाच्या आरक्षणाला धक्का न धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे असे पुन्हा एकदा ठणकावून सांगतानाच ज्या घटकाला आरक्षण द्यायचे आहे तो घटक मागास आहे हे दाखवावे लागते. मात्र काहीजण वेळ द्यायला तयार नाही. लगेच द्या बोलत आहेत नाहीतर मुंबईत येतो बोलत आहेत. आरक्षण कायद्यात टिकावे लागते मात्र युवक – युवतींच्या भावना भडकवल्या जात आहेत. तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र जाळपोळ न करता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे. कायदा हातात घेऊ नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे आपल्या महापुरुषांनी शिकवलेले नाही अशा शब्दात अजित पवार यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता खडेबोल सुनावले.

लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ जागा पैकी ४५ जागा कशा निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

चार नैसर्गिक आपत्ती आल्या मात्र कोकणातील माणूस खचला नाही – सुनिल तटकरे

दादांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व महाराष्ट्रात आम्ही निर्माण करत आहोत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला अल्पसंख्याक समाजाने विरोध केला अशी अफवा पसरवण्याचे काम झाले त्यानंतर एनडी आघाडीची पहिली सभा श्रीवर्धनमध्ये झाली. मात्र इथला मुस्लिम समाज मोठया संख्येने माझ्या पाठीशी उभा आहे हे आजच्या सभेने दिसून आले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना सुनावले.

२००९ नंतर मला वित्तमंत्री पद मिळाले ते फक्त अजितदादा पवार तुमच्यामुळे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेल्या माझ्या श्रीवर्धनचे आणि कोकणातील लोक बदलत आहेत. इथे पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला गेला आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

पुढच्या पंधरा दिवसात रेवस – रेड्डी पुलाच्या कामाची निविदा निघालेली दिसेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आमच्या रोमारोमात पुरोगामी विचार भिनलेले असून त्या विचारावर आमची वाटचाल सुरू आहे. दादांनी घेतलेल्या निर्णयाला साथ दिलात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी आभार मानले.

चार नैसर्गिक आपत्तींना आपण समोर गेलो मात्र कोकणातील, श्रीवर्धन येथील माणूस खचला नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कोकणाच्या लोकांचे कौतुक केले.

२२ कोटी ७३ लाखाची पाण्याची योजना श्रीवर्धनकरांना दिली आहे. अतिरिक्त पाण्याची सुविधा माता भगिनींसाठी केली आहे. श्रीमंत पेशवे यांची ही भूमी आहे. ५ कोटीचा निधी स्मारकासाठी प्रस्तावित केला आहे. डिजिटल लायब्ररी पहिली श्रीवर्धनमध्ये झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन उभे करत आहोत. १ कोटी ९१ लाख रुपये सीसीटीव्ही कॅमेर्‍यासाठी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

श्रीवर्धन मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. या महिलांच्या सहकार्याने मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्प व बीच सुशोभिकरण कामांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला.

श्रीवर्धन शहरातून भव्य रॅलीने अजितदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. कोळी बांधवांच्यावतीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!