मौजे मसुरे (मार्गाची तड) ता.मालवण येथील निराधार जख्मी व्यक्ती राजेंद्र श्रीधर बागवे यांना मिळाला संविता आश्रमचा आधार

संविधान दिनी संदिप परब यांनी निराधार आजारी व्यक्तीला मिळवून दिले मोलाचे सहाय्य
पायाच्या गंभीर जख्मेसह निराधार जीवन जगत होते बांधव – राजेंद्र बागवे
मालवण पासून १८ कि. मी अंतरावर असलेल्या मुक्काम मसुरे (मार्गाची तड) ता.मालवण जि.सिंधुदुर्ग गावात राजेंद्र श्रीधर बागवे ( वय ५५ ) हे व्यक्ती आपल्या वडिलोपार्जित घरात एकटे रहात होते. जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांना ही माहिती मुंबई जोगेश्वरी येथील महेश बागवे यांचे माध्यमातून मिळाल्यानंतर संदिप यांनी सहकारींसह तात्काळ मसुरे (मार्गाची तड) गाव गाठले. आणि राजेंद्र बागवे यांच्या डाव्या पायाच्या जखमेतुन वीस किडे काढून त्यांचेवर प्रथमोपचार करून त्यांना पोलीसांच्या मदतीने संविता आश्रमात दाखल केले.
संविता आश्रममधील संदिप यांचे सहकारी ऊदय कामत व आश्रमातील बांधव सागर व जसवंत नाईक हे यावेळी त्यांचे सोबत होते.
संविधान दिन काल संपुर्ण देशभर उत्साहात साजरा झाला. संविधानाच्या अनुच्छेद -४१ नुसार ,”राज्य म्हणजे देशाची संसद आणि राज्यांतील विधीमंडळे, कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार ( केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळे आणि प्रशासन) व न्यायमंडळ आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व राज्य व्यवस्थेने….आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत देशातील कामाचा व शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजारपण व विकलांगता यांनी पीडीत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जीणे वाट्याला आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत लोक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील असे म्हटले आहे….मात्र असे असताना आजघडीला एक राज्य व्यवस्था म्हणून समाजातील ठिकठिकाणच्या हजारो निराधार , आजारी व पीडीत व्यक्तींना माणूस म्हणून सन्मानाचे व माणूसकीचे जीवन मिळण्यासाठीच्या आवश्यक तरतूदी होण्यापासून आपण समाज आणि शासन म्हणून कोसो दूर आहोत….या पार्श्वभुमिवर जीवन आनंद संस्थेचे संदिप परब यांनी एका पीडीत व्यक्तीला त्याचे गंभीर आजारपणात सहाय्य मिळवून देण्यासाठी दाखविलेली सक्रीयता आणि केलेली कृती निश्चितच ठळकपणे समोर येते.
संदिप परब यांनी रस्त्यावरील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळवून देण्यासाठीच्या चळवळीतील सहभागी असलेल्या व साथ देत असलेल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
किसन चौरे,ब्यूरो न्यूज कोकण नाऊ





