आचरा ग्रामपंचायत, जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

आचरा प्रतिनिधी
आचरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जनतेतून निवडले जाणारे थेट सरपंच पद आणि 11 सदस्यपदा साठीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. मतदान रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होत असल्यामुळे आता उमेदवार निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठींना प्राधान्य देत आहेत. निवडणुकीत सरपंच पदासाठी 3 तर 13 सदस्यपदासाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत चार हजार 146 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 10 दिवसांपासून सभा, पदयात्रा, घोषणाबाजीने आचरा गावातील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानाच्या काही तास अगोदर प्रचार थांबवणे बंधनकारक असल्याने शुक्रवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. आता खऱ्या अर्थाने छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मतदानकेंद्र रचना ही प्रभाग क्रमांक 1 साठी केंद्र जिप शाळा हु डी बी कोयंडे पिरावाडी, प्रभाग क्रमांक 2 साठी केंद्र पूर्व प्राथमिक शाळा आचरे गाऊडवाडी, प्रभाग क्रमांक 3 साठी केंद्र जीवन विद्यामंदिर पारवाडी, प्रभाग क्रमांक 4 साठी केंद्र शाळा आचरे नंबर 1, प्रभाग क्रमांक 5 साठी केंद्र शाळा आचरे नं 1 केंद्र राहणार आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली असली, तरी यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आचरा पोलीस सज्ज असून यासाठी आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. सर्वच उमेदवार व कार्यकर्त्यांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.

error: Content is protected !!