कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील नातेवाईकांनाही कुणबी- मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे – भाई चव्हाण

कणकवली – मराठा आरक्षणासंदर्भात इतिहास कालीन कागदपत्रे तपासून कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या परिस्थितीत अशा कुटुंबियातील नातेसंबंध असलेल्यांना त्यांची कुणबी जात गृहीत धरून सरसकट मराठा-कुणबी असे प्रमाणपत्र राज्य शासनातर्फे देण्यात यावे, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी गेले ९ दिवस आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जुन्या मोडी लिपीतील कागदपत्र तपासणीत कुणबी जातीचा उल्लेख असलेल्यांना मराठा समाजातील कुटुंबियांना कुणबी जात म्हणून मराठा-कुणबी अशी प्रमाणपत्रे तातडीने देण्यात येतील असे जाहीर केले आहे. मात्र या नोंदी अत्यल्प प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्रे मिळणार्यांची संख्याही अत्यल्प असणार आहे, असे स्पष्ट करून चव्हाण यांनी आजही मराठा समाजामध्ये ९६ कुळी मराठा, गावडे, गुरव, घाडीगांवकर अशा काही पोटजाती आहेत. या मराठा पोटजाती समाजातील मंडळी मुली-मुलांची लग्ने जुळविताना या बाबींचाही अवश्य विचार करताना दिसतात. या परिस्थितीत त्यांच्या नात्यातील कोणत्याही एकाद्या कुटुंबाची नोंद कागदपत्रांवरून कुणबी नोंदवली जाणार असेल तर त्यांच्याशील संबंधित सर्वंच नातेवाईक, त्या नातेवाईकांच्या नातेवाईकांची नोंद कुणबी-मराठा करून त्यांनाही कुणबी-मराठा असे सरसकट जातीचे प्रमाणपत्र देण्याचा शासकीय आदेश पारित करण्यात यावा. त्यामुळे मराठा समाजातील बहुसंख्य कुटुंबियांना मराठा-कुणबी हे प्रमाणपत्र मिळणे सुलभ होईल.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात कागदपत्रांवरून कुणबी-मराठा नोंद असलेल्यांचा समावेश कुणबी म्हणून करून त्यांना या जातीची प्रमाणपत्रे देऊन त्यांना इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, ही वस्तुस्थिती असल्याने मी ९६ कुळी मराठा असताना मी माझी जात कुणबी म्हणून का लावून घ्यावी असा मानभावीपणा हा मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा गळ्यात मोठा धोंडा असेल.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आई-वडीलांच्या काबाडकष्टावर प्रतिकुल परिस्थित अभ्यास करून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवायचे. पण वैद्यकीय, इंजिनिअर, आयटी आदी कुशाग्र बुध्दीच्या क्षेत्रात आरक्षणाच्या कोट्यामुळे ४५ टक्क्यांवाल्यांना प्रवेश द्यायचा हे शैक्षणिक धोरण देशाच्या हितालाही बाधक आहे, त्यामुळे या क्षेत्रात असे बहुसंख्य विद्यार्थी प्रवेश मिळवूनही अपयशी ठरतात, त्यामुळे अशा क्षेत्रात गुणवत्तेनुसार निवडी व्हायला हव्यात, असे भाई चव्हाण यांनी म्हंटले आहे





