कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी करीता ईव्हीएम मशीन सील

5 नोव्हेंबर रोजी होणार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीकरिता मतदान
बिनविरोध झालेल्या प्रभागांमध्येही सरपंच पदाकरता राहणार ईव्हीएम मशीन
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूक साठी 8 ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कणकवली तहसीलदार कार्यालय या ठिकाणी पार पडली. 5 नोव्हेंबर रोजी या सार्वत्रिक व पोटनिवडणूक करिता मतदान होणार असून 4 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पाठवल्या जाणार आहेत. तर 6 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये या मशीन सील करण्यात आल्या. यामध्ये कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणे या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून बेळणे मध्ये दोन प्रभाग करिता व सरपंच पदाकरिता तर ओटव मध्ये दोन प्रभाग व सरपंच पदाकरता निवडणूक घेतली जात आहे. तर हळवल, वारगाव मध्ये प्रत्येकी एका जागे करिता मतदान घेतले जाणार आहे. ओटव व बेळणे मधील प्रभाग क्रमांक दोन ची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी या ठिकाणी सरपंच पदाकरिता ईव्हीएम मशीन ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली