काँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती

मग एवढ्या वर्षात तुम्ही कोकणातील रोजगारासाठी किती प्रयत्न केले.

निवडणुका जवळ आल्या की कोकणात यायचं

भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका

भाजपा युती सरकारची १० वर्षांची सत्ता वगळता महाराष्ट्र राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती आणि त्यातील चार वेळा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रातही त्यांनी विविध पदे भूषविली. मग एवढ्या वर्षात तुम्ही कोकणातील रोजगारासाठी किती प्रयत्न केले. निवडणुका जवळ आल्या की कोकणात यायचं आणि आमचं प्रेम आहे आता जनतेची दिशाभूल करण बंद करा, अशी जोरदार टीका भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर केली

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी आताच्या सरकारवर महाराष्ट्रातील रोजगार हिरावून घेणारे सरकार अशा शब्दात टीका केली होती. त्याला माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. तुम्ही महाविकास आघाडीच्या नेते आहात त्यामुळे कोकणात आलेल्या सी वर्ल्ड, नाणार या सारख्या रोजगाराभिमुख प्रकल्पांना कोणी विरोध केला. याची माहिती घ्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कोकणात तीन लाख कोटी रुपयांचा नाणार प्रकल्प होणार होता. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. काही स्थानिक लोकांचा त्याला विरोध होता. स्थानिकांचा म्हणण्यापेक्षा काही सामाजिक एनजीओ त्याला विरोध करीत होत्या.
पहिल्या युती सरकारच्या काळात नारायण राणे मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी टुरिझम बोर्ड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने१९९९ मध्ये सरकार गेल्यानंतर तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचे असताना त्याचे पुढे काहीच झाले नाही. मग त्यासाठी रोजगार नसल्याचे खापर तुम्ही कोणावर फोडणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना ३२ वर्षांपूर्वी शिरोडा वेळागर तसेच आरवली भागात सिझा दी गोवा तसेच ताज सारख्या मोठ्या हॉटेल्ससाठी येथील जागा दिल्या. त्या ठिकाणी आपल्या घरातील कोणीतरी नोकरीला लागेल या उद्देशानेच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जागा दिल्या होत्या. मग ३२ वर्षांत त्या ठिकाणी काहीच झाले नाही याचे उत्तर आपण देणार आहात का, असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आपण मराठा आरक्षणाबाबत बोललात. तुम्ही संसद पटू आहात तुमच्याबद्दल नक्कीच आदर आहे. मात्र, शरद पवार तब्बल ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत. पहिले प्रयत्न राणे समितीने केले. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यासाठी पुढाकार घेतला. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं होतं मात्र ज्यावेळी तो विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. तेव्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी वकिलांची जी कुमक पुरवायला पाहिजे होती तिथे जो लक्ष घालायला पाहिजे होता तो घातला गेला नसल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे उगाच लोकांची दिशाभूल करू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक पक्षाला आपले संघटन वाढविण्याचा नक्कीच हक्क आहे. त्यासाठी प्रयत्न करणे हा देखील तुमचा अधिकार आहे. असा सल्ला दिला

प्रतिनिधी, सावंतवाडी

error: Content is protected !!