अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक बळकट संघटन राष्ट्रवादी काँग्रेसचे उभे राहिल – सुनिल तटकरे

दिवाळीनंतर अजितदादा पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन…
मुंबई – सामाजिक, शैक्षणिक, रोजगारासंदर्भात (पक्षीय सोडून) अनेक सामाजिक उपक्रम घेतले गेले त्याला उदंड प्रतिसाद विशेषतः महिलांचा व युवकांचा मिळाला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीत दादांच्या नेतृत्वाखाली एक बळकट संघटन राष्ट्रवादी काँग्रेसचे उभे राहिल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यभरातील ३० फ्रंटल सेलचे प्रमुखांची आज बैठक झाली याबाबतची माहिती सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.
आगामी निवडणूका आणि राजकीय घडामोडी व दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका यावर सखोल चर्चा बैठकीत करण्यात आली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. दिवाळीनंतर दादांचाही राज्यव्यापी दौरा होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुरू असलेली भूमिका आणि आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने उचललेली पाऊले याबाबत कालच पक्षाची भूमिका मांडली असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.
आमचे दौरे लवकरच सुरू होतील. संघटना मजबूत करण्यासाठी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध सेलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विशेष करून महिला व युवकांचे काम अत्यंत उत्तम पध्दतीने सुरू असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
आमच्यामध्ये झालेल्या दिर्घकाळ बैठकीमध्ये उध्दव ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे आणि ते कोणत्या मानसिक अवस्थेत पोचले आहेत व पुढची पाऊले कोणती उचलावी लागतील याबाबतची सविस्तर चर्चा संजय राऊत यांनी अजितदादांसोबत केली होती. दादांना हात जोडून पुढे काय करायचे अशी विनंती ते करत होते अशा संजय राऊतांनी अजितदादांवर टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे सुनिल तटकरे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ठणकावून सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. संयमाने हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार पाऊले टाकत आहे. मात्र आज ज्या आत्महत्या होत आहेत त्या सर्वांसाठी क्लेशदायक आहेत, दुर्दैवी आहे. सरकार सकारात्मक आहे फक्त कायद्याच्या कसोटीवर देण्यासाठी वेळ जातोय त्यामुळे संयम पाळवा अशी विनंती सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली.