सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे

विभाग प्रमुखांनी परिपत्रकाची अंमलबजावणी करावी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

वैभववाडी – राज्य शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने दि.१० ऑक्टोबर,२०२३ रोजी प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकाची विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग , सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मा.किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
सदर मेलची प्रत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. सिंधुदुर्ग यांना पाठवली आहे.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (र. व का.) राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयांत येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतु शासकीय कार्यालयांत हजर असलेले संबंधित अधिकारी / कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. ओळखपत्राबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी / कर्मचारी ओळखपत्र दाखवीत नाहीत.
या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही असे उपरोक्त दिनांक ०७ मे, २०१४ च्या शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. तसेच सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिका-यांनी योग्य ती कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
उपरोक्त बाबी विचारात घेता या परिपत्रकान्वये दिनांक ०७ मे, २०१४ च्या शासन परिपत्रकातील सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रवेशाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबधित प्रशासकीय विभागांना पाठवावीत. संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवरणपत्रात (परिशिष्ट “अ”) सामान्य प्रशासन विभाग (प्र.सु., र. व का.) यांच्याकडे सादर करावा. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३१०१०१६४०१४३५०७ असा आहे. सदर परिपत्रकाची जिल्ह्यातील सर्व आस्थापना विभाग प्रमुखांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी विनंतीवजा मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

error: Content is protected !!