देवगड-निपाणी मार्गावरील अवजड मल्टीएक्सेल वाहतुकीवर कारवाई करण्यास देवगड पोलिस उदासीन

म.न.वि.से देवगड तालुका पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
देवगड,- अवजड मल्टीएक्सेल वाहतुकीवर बंदी आणावी या वाहनांमुळे देवगड-निपाणी मार्गावर वाढलेले अपघात या विषयाला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवगड पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांना २० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी पोलिसांनी वेळ दिल्याने १० ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी पोलिसांमार्फत या वाहनांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. आमच्या अधिकार क्षेत्रात बंदी करणे बसणार नाही. अशाप्रकारची माहिती देण्यात आली. शिरगांव चेकपोस्ट हे फक्त अमली पदार्थ आणि अतिरेकी गतीविधींवर लक्ष ठेवण्यासाठीच असून इतर कोणत्याही वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही अशी माहिती दिली. पोलिस प्रशासनाने दाखविलेल्या उदासीनतेवर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आश्चर्यवजा खेद व्यक्त केला असून या वाहनांवर बंदी आणावी अशी जनतेतून आग्रही मागणी केली जात असल्यामुळे यानंतर लवकरच जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग परिवहन विभाग (R.T.O) यांची भेट घेऊन हा आमचा लढा असाच चालू ठेवणार आहोत अशाप्रकारची भूमिका घेण्यात आली. याप्रसंगी संतोष मयेकर, राकेश मिराशी ( म.न.वि.से तालुका अध्यक्ष), पुरूषोत्तम जाधव (म.न.वि.से शहर अध्यक्ष), राजा मोंडकर, बबलु परब, राजन पवार, अभिजीत तेली व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
देवगड, प्रतिनिधी





