बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या विरोधात कणकवली मतदार संघातील सरपंचांकडून प्रश्नांची सरबत्ती

आमदार नितेश राणे यांनी देखील सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल
एक महिन्यात प्रश्न सोडवा अन्यथा पुढील तयारी ठेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि त्यामुळे मोबाईल टॉवरचे जाणारे नेटवर्क, नवीन टॉवर निर्मितीसाठी जमीनी सह प्रस्ताव देऊन सुद्धा टॉवर उभारणीसाठी होणारी दीरंगाई या संदर्भात गावो – गावच्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे प्रधान महा प्रबंध यांच्यासमोर पाढा वाचला.कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.दरम्यान आमदार नितेश राणे यांनी जनतेच्या तक्रारींचे निरसन कसे करणार त्याचे वेळापत्रक ठरवा.प्रत्येक टॉवरचे नेटवर्क सुरळीत करा. ही सर्व कामे टाइम लिमिटमध्ये करा अशा सूचना केल्या. कोल्हापूर येथून आलेले प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी जेवढ्या तक्रारी आहेत त्यांचे निरसन एका महिन्यात केले जाईल. प्रत्येक महिन्याला त्या कामाचा आढावा घेतला जाईल असे आश्वासन दिले. टॉवरची रेंज का जाते आणि नवीन टॉवर उभारण्यासाठी कोणत्या गोष्टींची कमतरता राहिलेली आहे त्याचाही आढावा घेतला जाणार असे सांगितले. दरम्यान कणकवली, देवगड,वैभववाडी या तीन तालुक्यात नव्याने 157 बीएसएनएलचे टॉवर कोठेकोठे मंजूर झाले आहेत याची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.
आमदार नितेश राणे यांना मतदार संघात गावभेटीदरम्यान बीएसएनएलच्या नेटवर्क संदर्भातील अनेक तक्रारी येतात. याबाबत मुंबई येथे दूरसंचार निगमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा केल्यावर कोल्हापूर येथील महाप्रबंधकांच्या उपस्थितीत कणकवली येथे बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार आज मतदारसंघातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती. कणकवली प्रहार भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्यासह बीएसएनएलचे महाप्रबंधक अरविंद पाटील,भाजपचे उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,संतोष कानडे, नाशिक भाई काझी, अमोल तेली ,संतोष किंजवडेकर, मनोज रावराणे,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएलचे सावंतवाडी उपमहाप्रबंधक आर.वी.जाणू, कणकवली येथील जुनियर ऑफिसर नेरकर, सब डिव्हिजन इंजिनियर देवगड चे कैलास पायमोडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यादरम्यान बैठकीत भालचंद्र साठे, समीर नलावडे ,प्रकाश राणे,महेश गुरव, देवगड येथील अनेक सरपंच, भाजप पदाधिकारी यांनी तसेच कणकवली आणि वैभववाडी च्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या. काही गावांमध्ये टॉवर असून रेंज नाही. काही गावांमध्ये टॉवरच उभे झालेले नाहीत तर काही ठिकाणी टॉवरचे रेंज सातत्यपूर्ण राहत नाही. बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट जाते तेव्हा रेंज जाते. टॉवर योग्य जागी नसल्याने सर्व दूर रेंज पसरत नाही. असे अनेक प्रश्न यावेळी मांडले गेले. शेरपे सारख्या गावात टॉवर आहे पण तो चालू झालेला नाही अशी स्थिती समोर आली. बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालय, आरोग्य विभाग आणि रेशनिंग दुकान यांना रेंज गरजेची असते आणि ती जर मिळत नसेल तर यांचे व्यवहार ठप्प पडतात. जनतेला संपर्कासाठी रेज ही गाजर आहे. नेटवर्क नसल्याने अनेक लोकांचे नुकसान होते. बदलत्या जमान्यात संपर्कासाठी मोबाईल हाच पर्याय आहे. त्यासाठी बीएसएनएल ने आपलं नेटवर्क वाढवावे.असलेले टॉवर सुरळीत सुरू ठेवावेत. जे टॉवर नवीन निर्मिती करायचे आहेत त्याचे करार चुकीच्या पद्धतीने करून घेतले जात आहे. दुसऱ्या खाजगी कंपन्यांच्या नावे करणार करून घेतले जात आहे ते न करता ते बीएसएनएलने स्वतःच्याच नावे करावेत अशा प्रकारची चर्चा यावेळी झाली. प्रत्येक टॉवरची स्थिती रेंज 4g 3g 2g या संदर्भात चर्चा झाली. सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे नोट करून घेऊन त्यावर महिन्याभरात काम केले जाईल आणि सेवा सुरळीतपणे दिली जाईल व त्या सेवेचा आढावा सातत्याने घेतला जाईल असे आश्वासन सभेला उपस्थित असलेले कोल्हापूर येथील बीएसएनएलचे प्रधान महा प्रबंधक अरविंद पाटील यांनी दिले.
आमदार नितेश राणे यांनी या चर्चेदरम्यान अनेक सूचना केले . आजच्या या सभागृहात सरपंच आणि लोकप्रतिनिधी आहेत हे आपल्या गावातील किमान 2000 ग्राहकांचे प्रश्न मांडत आहेत हे लक्षात घ्या. 25 ते 30 हजार ग्राहकांसाठी आपण आज चर्चा करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत घडवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला मेहनत घ्यायची आहे.अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यावर काम केले तर निश्चितच 4 जी 5 जी नेटवर्क ग्रामीण भागातही मिळेल फक्त ते देण्या संदर्भातली सकारात्मक मानसिकता अधिकाऱ्यांनी करावी असे आवाहन केले.
कणकवली प्रतिनिधी