चरस’ विक्रीप्रकरणी मुंबई पोलिसांची सिंधुदुर्गात कारवाई

कणकवलीतून घेतले एकास ताब्यात

कणकवली, अमली पदार्थांची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (३०) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने मोबाईल लोकेशनद्वारे कणकवलीतून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास केली. विशेष म्हणजे सदरच कारवाई ‘चरस विक्री’ प्रकरणातील असून या अमली पदार्थ प्रकारात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारवाईपैकी ही एक कारवाई आहे. त्यामुळे या कारवाईची कणकवली शहर परिसरात मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान, कणकवली पोलीस ठाण्यात शौनक बागवे याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या कारवाईमध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार रवींद्र बाईत, पांडुरंग पांढरे आदी सहभागी झाले होते.

मुंबई येथील आझाद मैदान पोलीस स्थानकात ९ सप्टेंबर २०२३ रोजी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती या प्रकरणात अन्य संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. यातील शौनक बागवे हा संशयित कणकवलीत असल्याचे लोकेशन मुंबई पोलिसांना मिळत होते. त्यानुसार मुंबई पोलीस बुधवारी कणकवलीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिसांच्या मदतीने शौनक याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो राहत असलेल्या आचरा महामार्गलगत असलेल्या एका कॉम्पलेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुमच्या ठिकाणी असता शौनक तेथे नव्हता. मात्र, त्याचे वडील होते. पोलिसांनी त्यांच्याजवळ शौनक कुठे आहे, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी शहर ठिकठिकाणी शौनकला पडकण्यासाठी फिल्डिंग लावली. रात्री ८.३० वा. शहरातील एका हॉटेलमधून तो बाहेर पडला. तो राहत्या ठिकाणी पोहोचत असतानाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शौनक यापूर्वी मुंबईत अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो आचरा महामार्गालगत असलेल्या एका कॉम्पलेक्स राहत होता. या कारवाईमुळे कणकवलीतही अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रीय असल्याचे उघड झाले.

error: Content is protected !!