मालवण महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी

पर्यटन व्यावसायिक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र प्रशासन तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर सर्व घटक एका व्यासपीठावरती आणण्याच्या दृष्टीने स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने 2021 सालामध्ये पर्यटन सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली.
प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय उत्तमरीत्या आकाराला आला आहे. उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ साधून जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा, त्यामध्ये धोरणात्मक योगदान देता यावे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विद्यार्थी आणि समाजामध्ये पर्यटन व्यवसायाविषयी आणि शाश्वत, जबाबदार पर्यटनाविषयी जागृती निर्माण व्हावी, या बाबत अधिकाधिक संवाद वाढीस लागावा, या उद्देशाने महाविद्यालयाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून वारसा पर्यंटन (Heritage Tourism) या संकल्पनेवर आधारित ‘पर्यटन सप्ताह’ आयोजित केला आहे. हा पर्यटन सप्ताह दिनांक 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधी मध्ये संपन्न होणार आहे.
या पर्यटन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता आपल्या महाविद्यालयातील नरहरी झांट्ये सभागृहात आयोजित केला आहे. नागपूर येथील भारतीय शिक्षण मंडळाच्या ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक आणि देशभरातील अनेक विद्यापीठांच्या संग्रहालय, पुरातत्व, सांस्कृतिक, इत्यादी विविध समित्यांचे तज्ञ संचालक आणि उत्तम वक्ते असणारे डॉ. भुजंग बोबडे हे या सोहळ्यासाठी उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण परिसरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांचे व्याख्यान समस्त मालवणवासियांसाठी, पर्यटन अभ्यासक आणि व्यवसायिक मंडळींसाठी उपयुक्त ठरणार आहे.
तसेच या सोहळ्यास मा. जिल्हाधिकारी किशोर तावडे, तसेच भारत पर्यटन नवी दिल्लीच्या सहसंचालक मा. भावना शिंदे यांची खास उपस्थिती लाभणार आहे. युवा टुरिझम क्लब, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी केले आहे.
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि युवा टुरिझम क्लब तसेच महाविद्यालयातील इतर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पर्यटन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा व जाहीर व्याख्यान, त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम, दिनांक 28 रोजी हेरिटेज टुरिझम या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा, दिनांक 29 रोजी स्टुडन्ट सेमिनार, दिनांक 30 रोजी पर्यटन व्यावसायिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जीआयएस विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पर्यटन क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर वेबिनार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी राजवाडा या ऐतिहासिक वारसा स्थळास भेट, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी भारतीय वारसा स्थळे या विषयावर जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन रांगोळी स्पर्धा असे विविधांगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यातील विविध उपक्रमात भाग घेण्यासाठी डॉ सुमेधा नाईक यांना 9404924678 या व्हॉट्स अप वर मेसेज करावा. उद्घाटन सोहळ्यास मालवण वासियांनी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

मालवण ( प्रतिनिधी)

error: Content is protected !!