अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार..
कणकवली,- तालुक्यातील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी शनिवारी सकाळी बेपत्ता झाली असून तिला कुणीतरी फूस लावून पळविले, अशी तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीनुसार, मुलगी शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घरी होती, त्यावेळी तिचे वडील कामावर निघून गेले. तर आई कपडे धुण्यासाठी ओहोळावर गेली. तत्पूर्वी मुलीने आपण काकांच्या घरी जाणार असल्याचे आईला सांगितले होते. ११.३० वा. सुमारास आई घरी आली असता तिला मुलगी दिसली नाही. तिने मुलीच्या काकांकडे चौकशी केली.
मात्र, मुलगी तिथेही गेली नव्हती. तिला कुणीतरी फूस लावून पळविल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.