माझे ज्ञानदान विद्यार्थ्यांना तिमिरातुनी तेजाकडे नक्कीच घेऊन जाईल- सत्यवान यशवंत रेडकर

पुण्यातील मामासाहेब मोहोळ महविद्यालयात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महविद्यालयात शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक दीपक राज मस्के यांच्या शुभहस्ते झाले. प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून आपले उज्वल भविष्य साकारले जाऊ शकते, त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे याविषयी मार्गदर्शन केले. दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मस्के व अध्यक्ष अर्चना मस्के यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, उच्चविद्याविभूषित, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. व्यसन हे ध्येयप्राप्तीसाठी असावे, विद्यार्थ्यांसाठी अशा मौल्यवान व्याख्यानांची आवश्यकता आहे त्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील राहील असे मत अर्चना म्हस्के यांनी व्यक्त केले.
श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, स्पर्धा परीक्षेतील संधी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा यासंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. हे त्यांचे 214 वे निःशुल्क व्याख्यान होते. “लोक अन्नदान करतात, रक्तदान करतात परंतु मी ज्ञानदान करतो. माझ्याकडे पैशांची नाही तर मनाची श्रीमंती आहे, जसे विद्यार्थ्यांचे जन्मदाते हे पालक असतात तसे आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचे सामाजिक पालक आहोत कारण आम्ही सुद्धा त्यांच्या भविष्याचा विचार करतो आणि त्यामुळेच कोणताही मोबदला न स्वीकारता नि:शुल्क स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन गरजू विद्यार्थ्यांसाठी निरंतर करत असतो. आई-वडिलांचे डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजेत असे त्यांनी प्रतिपादन केले. तिमीरातुनी तेजाकडे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाला पुढे घेऊन जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला, अनेक राज्यस्तरीय व केंद्रातील स्पर्धा परीक्षांचे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मार्फत विविध तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्याविषयी लवकरच नियोजन केले जाईल याची ग्वाही दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ.आदिनाथ पाठक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुख डॉ. रूपाली शेंडकर यांनी केले . याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सुनिता डाकले, डॉ मेघना भोसले, प्रा लक्ष्मण उकिर्डे, प्रा संतोष मोरे, डॉ स्वाती शिंदे, प्रा तानाजी जाधव, प्रा. विद्या किरवे आणि इतर सहकारी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती करंजावणे यांनी केले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल लोणारे यांनी आभार प्रदर्शन केले.