खारेपाटण तावडेवाडीतील त्या 33 लोकांचे स्थलांतरण होणार

डोंगरभाग खचण्याच्या प्रकारामुळे निर्णय
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
नायब तहसीलदार शिवाजी राठोड घटनास्थळी दाखल
खारेपाटण तावडेवाडी येथील डोंगर भागात डोंगराला भेगा जाण्यासह काही तेथील घरांच्या अंगणाचा भाग खचल्याने तेथे असलेल्या त्या 5 घरांमधील 33 लोकांचे स्थलांतरण करण्यासंदर्भात महसूल विभागाकडून तात्काळ उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. दरम्यान नायब तहसीलदार शिवाजी राठोड हे घटनास्थळी दाखल झाले असून, तेथील ग्रामस्थांची त्यांनी संवाद साधला. खारेपाटण तावडेवाडी येथील 5 घरामधील 6 कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्यानंतर त्यातील काही कुटुंबानी स्थलांतरित करण्याऐवजी आम्ही नातेवाईकांकडे जातो असे सांगितले याची माहिती तहसीलदार श्री देशपांडे यांनी दिली. महसूल प्रशासनाकडून या लोकांच्या स्थलांतरणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणी नायब तहसीलदार शिवाजी राठोड व सरपंच प्राची इस्वलकर या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळच्या सत्रात तावडेवाडी भागात डोंगर भागात असलेला काही भागाला भेगा गेल्याचा व काही लोकांच्या अंगणाचा भाग खचण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सकाळी या संदर्भात कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





