बांदा शहरातील गणेश रेसिडन्सी मधील दुकान फोडून सुपारीची चार पोती चोरी करणाऱ्या संशयिताच्या बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

सावंतवाडी

बांदा शहरातील गणेश रेसिडन्सी मधील दुकान फोडून सुपारीची चार पोती चोरी करणाऱ्या संशयिताच्या बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बाबा खान (२६, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. संशयित हा बांदा परिसरात सुपारी विकण्यासाठी फिरत होता.
बांदा येथील शामसुंदर रामकृष्ण नाटेकर यांच्या दुकानातील ४० किलोची ४ सुपारीची पोती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आले होते. त्यानुसार त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली होती. याबाबत बांदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला होता.
बांदा पोलिसांनी गुरुवारी सकाळी तपासाची चक्रे फिरवली. बांदा परिसरातील सुपारी खरेदीदारांची चाचपणी केली असता त्यांच्याकडे वरील संशयित सुपारीचा दर काढण्यासाठी आल्याचे समोर आले. दरम्यान, सायंकाळी बांदा पोलीस उपनिरीक्षक दीपक पडवळ, कॉन्स्टेबल सिताकांत नाईक, राजेश गवस यांनी बांदा आळवाडी येथुून त्याला ताब्यात घेतले. खाकीचा हिसका देताच त्याने गुन्ह्याची कबुली देत लपवून ठेवलेला मुद्देमालही दाखविला.
बांदा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई करत मुद्देमालासह ताब्यात घेतले. २४ तासांच्या आत पोलीसांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावला. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!