वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडुर येतील कातभट्टीवर वनविभागाचा छापा
सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने केली धडक कारवाई
वेंगुर्ला
सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील मौजे डेगवे येथील शासकीय जंगलातील खैर वृक्षतोडीतील फरारी मालाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत वेंगुर्ला तालुक्यातील जय गणेश काथ इंडस्ट्रीज, पेंडूर येथे सुमारे 55.333 घ.मी. विनापासी अवैध खैरकिटा तसेच कातभट्टी अटी-शर्तीचा भंग केल्याने सूमारे 9.96 टन कातवडी देखील जप्त केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वनविभाग सावंतवाडीचे पथकाला पेंडूर ता. वेंगुर्ला येथील जय गणेश कात इंडस्ट्रीज येथे पुन्हा शासकीय जंगलातील खैर किटा आणला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने काल 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने कातभट्टी व परिसराची अचानक धाड टाकून तपासणी केली असता अवैध विनापासी खैर किटा 54.333 घ. मी. आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. तसेच कातभट्टी अटी शर्तीचा भंग केल्याने तयार कातवडी सुमारे 9.96 टन जप्त करून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2ब) तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 53, 63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी वनविभागाकडून आवाहन करण्यात आले कि ‘लाकूड मालाची अवैध विनापासी वाहतूक करणे, कातभट्टी अटी शर्तींचे उल्लंघन करणे हा वनगुन्हा असून भारतीय वन अधिनियम 1927 चे विविध कलमांचे तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 मधील नियमांचे उल्लंघन असुन तो दंडनीय अपराध आहे.’
सदर कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मदन क्षीरसागर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी व श्री. अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी यांनी श्री. सावळा कांबळे वनपाल मठ, पृथ्वीराज प्रताप वनपाल आजगाव, वनरक्षक वि. श. नरळे, सूर्यकांत सावंत, आप्पासो राठोड, वैशाली वाघमारे, वनमजूर श्री. इब्रामपूरकर, श्री. पाडावे, राहुल मयेकर यांनी यशस्वी केली.