तहसीलदार म्हणतात नदीपात्रात पाणी सोडले: पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्य!

भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी वेधले होते लक्ष
जानवली नदीपात्र कोरडे: नळयोजना पाण्या अभावी बंद पडण्याची शक्यता
कणकवली तालुक्यातील जानवली नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडा ही मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी करून जवळपास पाऊण महिना उलट झाला तरी या धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्यात आलेले नाही. दरम्यान श्री मेस्त्री यांनी आठ दिवसापूर्वी कणकवली तहसीलदार आर जे पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याचे सांगितले अशी माहिती मेस्त्री यांनी दिली. परंतु पाणी सोडले असे सांगून जवळपास दहा दिवस उलटले तरी अद्याप पर्यंत हे पाणी नदीपात्रात सोडलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या नदीपात्रालगत असलेल्या नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. तर नजीकच्या गावांना देखील पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. तसेच धरणाचे पाणी सोडलेले नसताना देखील पाणी सोडल्याची माहिती श्री. मेस्त्री यांना तहसीलदार श्री. पवार यांनी दिल्याने यामुळे या नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण पसरले. त्यामुळे जानवली नदीपात्रात पावसाआधी हरकुळ तलावाचे पाणी येणार का? की ही मागणी कागदावरच राहणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली