कोकणकन्या फुल्ल, कोकणात चाकरमान्यांची मोठी गर्दी

शाळांना सुट्या, लगीन सराईसाठी चाकरमानी कोकणात

कुडाळ : मे महिना सुरू झाला असून कोकणात सुटीच्या काळात येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यावर्षी आंबा कमी असला तरी जांभूळ, फणस, काजू पीक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासमवेत दाखल होतोय. काही चाकरमान्यांनी तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे तिकीट कन्फर्म केले. पण अनेक प्रवाशांना वेटींग तिकीट किंवा जनरलमधून रेल्वे प्रवास करावा लागत आहे. जादा ट्रेनचे आरक्षण फुल्ल असल्याने काही चाकरमान्यांनी खाजगी बसेसला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यात चालू महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने आणखीनच गर्दी वाढली आहे.
कोकणात दाखल होण्यासाठी मुंबईकरांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकण रेल्वेला अधिक पसंती दिलीय. मुंबईहून सुटणाऱ्या कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी, मांडवी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा, नेत्रावती गाड्यांना तुफान गर्दी पाहायला मिळत आहे रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कोकण रेल्वेची स्थानके ट्रेन दाखल होताच येथे मोठी गर्दी दिसून येत आहे.

तुतारी, दिवा-सावंतवाडी, जनशताब्दीला अधिक पसंती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्थानक असलेल्या कुडाळ येथे सुद्धा सकाळी येणारी ८ वाजता येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून चाकरमानी मोठ्या संख्येने उतरत आहेत. तर तुतारी एक्सप्रेसला सुद्धा मोठी गर्दी आहे. मुख्यत्वे तुतारी एक्सप्रेस ही कोकण रेल्वे मार्गावर अधिकतर स्थानकांवर थांबत असल्याने अगदी चिपळूणपासून सावंतवाडीपर्यंत ही गाडी पॅक असते. तर पहाटे मुंबईतून सुटणारी सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये सुद्धा चाकरमानी मोठ्या प्रमाणात आहेत. पुढील महिनाभर कोकणात अशाप्रकारे चाकरमान्यांची मांदियाळी पाहायला मिळेल.

रोहन नाईक, कुडाळ

error: Content is protected !!