कुडाळ बसस्थानकाचे कोलमडलेले वेळापत्रक तातडीने सुधारा

युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन
कुडाळ परिसरातील नियमित प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना एसटी बसच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा मोठा फटका बसत असल्याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. बससेवा तातडीने पूर्ववत न केल्यास प्रवाशांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कुडाळ आगाराच्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कुडाळ–पणजीसह शालेय आणि ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या फेऱ्या वेळेवर सुटत नसल्याने नोकरदारांना कामावर पोहोचण्यास विलंब होत आहे, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक फेऱ्या अचानक रद्द केल्या जात असून काही बसेस दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत.
तसेच बसेसना सीएनजी भरण्यासाठी ओरोस-खर्येवाडी येथे जावे लागत असल्याने वेळेचा मोठा अपव्यय होत असून त्याचा थेट परिणाम बससेवेवर आणि प्रवाशांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने आतापासूनच योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
युवासेनेच्या प्रमुख मागण्या :
१) कोलमडलेल्या सर्व बसफेऱ्या तातडीने पूर्ववत करून वेळेवर सुरू कराव्यात.
२) चालक-वाहकांच्या कमतरतेवर त्वरित उपाययोजना करून बससेवा नियमित करावी.
३) सीएनजी भरण्याचे नियोजन असे करावे की त्याचा प्रवासी फेऱ्यांवर परिणाम होऊ नये.
४) गणेशोत्सवासाठी जादा बसफेऱ्या व अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे नियोजन तातडीने जाहीर करावे.
कुडाळ बसस्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनाची तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील, असा इशारा मंदार शिरसाट यांनी दिला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर सावंत, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, तालुका समन्वयक बबन बोभाटे, बाळा पावसकर, अमित राणे, धीरेंद्र चव्हाण, शैलेश काळप, गुरु गडकर आदी उपस्थित होते.






