सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “त्या” गुटखा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

माजी आमदार वैभव नाईक यांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी
ओरोस येथे पकडलेल्या गुटखा प्रकरणी ट्रक चालक व मालकावर कारवाई करून मूळ आरोपींकडे दुर्लक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवार 4 जुलै २०२६ रोजी ओरोस येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर कारवाई करत तीन संशयितांना अटक करून ८ लाखाच्या गाडीसह २१ लाखांचा गुटखा, जप्त केला. मात्र या ट्रकचालक मालकावर गुन्हे दाखल करून पोलीस खऱ्या गुटखा व्यापाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे या मोकाट सुटलेल्या गुटखा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या मार्फत आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे व सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुटखा पकडण्यात आला. मात्र त्या त्या वेळी ट्रक चालक, ट्रक मालक व त्या गाडीत असलेल्या व्यक्तीवरच गुन्हे दाखल करून कारवाई केल्याचे दाखविले गेले., प्रत्यक्षात जे गुटखा व्यापारी आहेत ते मोकाट सुटलेले आहेत. हे व्यापारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. परंतु पोलिस विभागाने या खऱ्या व्यापारी व सूत्रधारांवर कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही तसा तपासही केल्याचे दिसून येत नाही.
तरी याबाबत पोलिस विभागाने सखोल तपास करून हा गुटखा कोणाचा आहे ? या मागील खरा सूत्रधार कोण? याची सखोल चौकशी करावी व प्रत्यक्षात जे खरे गुटखा व्यापारी आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे या निवेदनांमध्ये म्हटले आहे.






