सिंधुदुर्गातील महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहणार !

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचे प्रमुख इर्शाद शेख यांचे प्रतिपादन
भाजपला सिंधुदुर्गातून हद्दपार करणार : शेख
भाजपला प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार : अमित सामंत
कुडाळ : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची सभा आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे प्रमुख इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, विकास सावंत, अनंत पिळणकर, भास्कर परब, चंद्रकांत गावडे, नागेश मोरये, अतुल बंगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकदिलाने काम करीत आहे. ही वज्रमूठ सिंधुदुर्गातही कायम राहावी हा आमचा विश्वास आहे. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा सामना करावा लागेल. यासाठी महविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ग्राउंड लेव्हलवर काम करीत आहेत.
यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तसेच समन्वय समितीचे प्रमुख इर्शाद शेख म्हणाले की, पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणीची सभा होईल. जिल्ह्यातील प्रमुख शहरे, सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. राज्यात वज्रमूठ करून महाविकास आघाडी भाजपला टक्कर देत आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वज्रमूठ कायम करणार आणि भाजपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करणार असा विश्वास इर्शाद शेख यांनी व्यक्त केला.
देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून जिल्ह्यातील अनेक प्रश्न महाविकास आघाडी एकत्र येऊन मार्गी लावेल. जिल्ह्यात शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम असून शिक्षणमंत्री मात्र आपल्या जिल्ह्याचे असले तरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नवीन शिक्षण धोरणाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर काहीच बोलत नाहीत. एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकार पूर्णता अपयशी ठरले असल्याची टीका इर्शाद शेख यांनी यावेळी केली.
सध्या गाजत असलेल्या अदानी प्रकरणाबाबत चौकशी होत नाही. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांची चौकशी होते. तर अदानी प्रकरणाबाबत भाजप नेते मात्र काहीच बोलत नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी थेट मोदींवर आरोप केलेत. त्यात त्यांनी केजरीवाल यांनी हा अदानी घोटाळा नसून तो मोदींचा घोटाळा आहे, अशी टीका केली आहे.
स्थानिकांना विचारात घेवून सी वर्ल्ड पूर्ण करावा : शेख
पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत विचारणा केली असता हा प्रकल्प होण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन तो पूर्ण करावा जेवढी आवश्यक जागा आहे तेवढीच घ्यावी, असे इर्शाद शेख यांनी सांगितले.
देवगड नगरपंचायत बाबत कायदेशीर बाबी तपासणार : अमित सामंत
देवगड नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीचा गट स्थापन आहे. त्यामुळे येथून भाजपला कोणाचेही समर्थन होणार नाही. याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीड पदवीधारकांचे उपोषण सुरू होते याकडे जिल्ह्याचे आमदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे या उपोषणाकडे दुर्लक्ष झाले, अशी टीकाही सामंत यांनी केली.
जिल्ह्यातील १०८ क्रमांक रुग्णवाहिका बंद होणार : अमित सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दबावाला कंटाळून हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन महिन्यात 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्स बंद होतील असंही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी चिपी एअरपोर्ट हे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. येथून प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नाहीत, विमान फेऱ्या उशिरा येतात, हा मुद्दा उपस्थित केला असता यावर आज खासदार विनायक राऊत यांच्याशी आपण महाविकास आघाडीचे पदाधिकारी चर्चा करतील असे सांगितले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही: संजय पडते
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले की, तिन्ही पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्र काम करतील. भविष्यातील सर्व निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवू. भाजप आमचा राजकीय शत्रू आहे. जिल्ह्यात भविष्यात महाविकास आघाडीचे मेळावे होतील त्यावेळी तिन्ही पक्षांचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. एकंदरीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही असाही विश्वास संजय पडते यांनी व्यक्त केला.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ





