झाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर

झारापच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरुद्धचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत २० मतांनी मंजूर झाला. ग्रामसभेत एकूण ७३४ मतदान झाले. त्यापैकी ३६६ मते अविश्वासाच्या बाजूने, ३४६ विरोधात, तर २२ मते अवैध ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेली ही चुरशीची लढत अखेर सरपंचांच्या पराभवाने संपली. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ८ विरुद्ध २ अशा मतांनी ठराव मंजूर झाला होता, मात्र खरी निर्णायक लढत ग्रामसभेतच रंगली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशाने ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती; मात्र कुडाळ येथे आमसभा असल्याने ती ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतर कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या बंदोबस्तात ही सभा पार पडली, मात्र प्रचंड गर्दीमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले. दरम्यान केवळ २५० मतदारांचा अंदाज धरून केलेल्या व्यवस्थेमुळे प्रत्यक्षात ८०० पेक्षा अधिक लोक जमल्यावर प्रशासनाची धांदल उडाली.

error: Content is protected !!