कणकवलीत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

डबलबारी भजनाचा सामना
मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन
माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेलीआळी मित्र मंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग व शिवसेना (उबाठा) तालुका कणकवली यांच्या सहकार्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता तेलीआळी, कणकवली येथे आमने-सामने “डबलबारी भजनाचा जंगी सामना” आयोजित करण्यात आला आहे. या भजन सामन्यात बुवा संदीप लोके (वडची देवी प्रसादिक भजन मंडळ, देवगड) आणि बुवा श्री. गंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ, वर्दे कुडाळ) यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत नेहरू नगर, कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अँजिओप्लास्टी, कर्करोग, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मूत्रविकार, प्रोस्टेट, मोतीबिंदू, हर्निया, थायरॉईड, महिलांचे गर्भाशयाचे आजार, मणक्याच्या समस्या आदी विविध आजारांवर तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. काही शस्त्रक्रिया मोफत तर काही अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या उपक्रमांत जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक व नेत्रतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






