रास्ता रोको प्रकरणी राजू शेट्टी, वैभव नाईक यांच्यासह ३७ जणांवर गुन्हे

राजू शेट्टींच्या विनंतीला प्रशासनाकडून केराची टोपली

जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल न करण्याच्या मागणीला आंदोलनावेळी दर्शवला होता होकार

आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी काल नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन झाले होते. या आंदोलन प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह ३७ जणांवर कणकवली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे आंदोलन स्थगित करताना राजू शेट्टी यांनी जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षकांना आमच्या कुणावरही गुन्हे दाखल करू नका अशी विनंती केली होती. परंतु या विनंतीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली असून सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी या आंदोलनात ५० ते ६० जण सहभागी असल्‍याचे म्‍हटले आहे. तर ३७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात मनाई आदेशाचा भंग करणे तसेच रस्त्यावर बसून आणि चालत जावून महामार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करणे, जमावाला भडकविण्याचा प्रयत्‍न करणे या प्रकरणी शेतकरी नेते देवाप्पा आण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (राह. शिरोळ, कोल्‍हापूर), स्वस्तीक पाटील (राह.इचलकरंजी), माजी आमदार वैभव नाईक (राह.कणकवली), कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक (राह.कणकवली), कणकवली नगराध्यक्ष संदेश भास्कर पारकर (राह. कणकवली बाजारपेठ), तात्या भिवा निकम (राह. तोंडवली), हनुमंत ऊर्फ राजा मधुकर म्हसकर (राह. नांदगाव), उत्तम सुरेश लोके (राह. नाटळ), प्रविण अर्जुन वरुणकर (रा तळेरे), आनंद मामाजी ढोके (राह. वाडातर), किरण हरिश्चंद्र टेंबुलकर (राह. किजवडे), गणेश गावकर (राह. मिठमुंबरी), गणेश गोपाळ वाळके (राह. मिठमुंबरी), विलास मधुकर साळसकर (राह.साळशी), विजय मधुकर पाडावे ( राह. किंजवडे), शंकर सुर्यकांत नानेरकर (राह. कुणकेश्वर), राजेंद्र महादेव पाटील (राह. जामसंडे), जितेंद्र जयप्रकाश जाधव (राह, पडवणे), अजय सुधाकर नानेरकर (राह. कुणकेश्वर), नरेश सखाराम डामरी (राह. मिठमुंबरी), तिमीर सुधाकर माणगावकर (राह. तळेबाजार), दिव्या दिनेश कोचरेकर (राह. भरडनाका मालवण), अनिकेत अनिल फाटक (राह. रेवतळे), गोविंद ऊर्फ आप्पा रामचंद्र चव्हाण (राह. वायरी), संजय गंगाधर नरे (राह. कुंभारमाठ), संजय दत्ताराम गावडे (राह. अणसुर वेंगुर्ला), विजय वासुदेव नाईक (राह. वेतोरा), नागेश ऊर्फ पिंटु मोहन गावडे (राह. गावडेवाडी वेंगुर्ला), व्यंकटेश जगन्नाथ नर (राह. उंडील), महेंद्र दत्ताराम मांडवकर (राह. पोंभुर्ले), अमोल प्रकाश जोशी (राह. वाघोटण), प्रशांत पांडुरंग वाडेकर (राह. पोभुर्ले), रविंद्र भिकाजी पाळेकर (राह. पाळेकरवाडी), काशिराम परशुराम पाळेकर (राह. पाळेकरवाडी), संदिप हरिश्चंद्र डोळकर (राह. गिर्ये), विजय सुरेश प्रभू (राह. आंदुर्ले, कुडाळ), राजेंद्र शामराव गड्यानवर (राह. गडहींग्लज) अादींचा समावेश आहे.
या सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १२६ (२), १९०, २८५, २२३ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (इ), (फ), ३७ (३), १३५(१), १३५(३) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस पांडुरंग कळंत्रे यांनी फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.

error: Content is protected !!