एड्स दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून जनजागृती रॅलीचे आयोजन

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसी विभागांद्वारे तसेच कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेचे अमित पाटील आणि त्यांचे सहकारी, मानसिंग पाटील, महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख डॉ. एस. टी. आवटे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सभा शहा, प्रा. प्रणव तेंडोलकर, डॉ. योगेश कोळी, डॉ. कमलाकर चव्हाण तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.
रॅलीमध्ये महाविद्यालयातील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संत राऊळ महाराज महाविद्यालय ते कुडाळ बाजारपेठ असा रॅलीचा मार्ग होता. विद्यार्थ्यांनी एड्सविषयी जागरूकता, प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृतीपर घोषवाक्ये आणि फलकांद्वारे संदेश दिले.
रॅलीनंतर महाविद्यालयात जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्गचे मानसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स दिनाचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षित आचरण आणि युवा पिढीची जागरूकता याबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक एड्स दिनानिमित्त घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण निर्माण करणारा आणि आरोग्यविषयक सजगता वाढवणारा ठरला.

error: Content is protected !!