गोवा आयर्नमॅन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या प्रमोद भोगटे यांचे उल्लेखनीय यश

स्विमिंग, सायकलिंग आणि रनींग दिलेल्या वेळेत केले पूर्ण

अशी कामगिरी करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्पर्धक

स्पर्धेत ३१ देशातले सुमारे १५०० स्पर्धक सहभागी

६८४ स्पर्धकानीच केली दिलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण

गोव्यात रविवारी झालेल्या गोवा आयर्नमॅन ७०.३ हि दमश्वासाची परीक्षा घेणारी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळच्या प्रमोद भोगटे यांनी ४५ ते ४९ या वयोगटात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशविदेशातून सुमारे पंधराशे स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग अशी सुमारे ११३ किलोमीटरची स्पर्धा प्रमोद भोगटे यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केली. साडे आठ तासात हे अंतर पूर्ण करायचं असत, प्रमोद याना हे अंतर पूर्ण करण्यासाठी ८ तास २५ मिनिटं लागली. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे प्रमोद भोगटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले स्पर्धक ठरले आहेत. सोमवारी कुडाळ मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग सायकल क्लबच्या वतीने हि माहिती देण्यात आली. या स्पर्धेत ३१ देशातले स्पर्धक सहभागी झाले होते. पंधराशे स्पर्धकांपैकी फक्त ६८४ स्पर्धकांनी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण केली. अशी माहिती गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे आणि रुपेश तेली यांनी दिली.
अतिशय मानाची समजल्या जाणारी गोवा आयर्नमॅन ७०.३ हि स्पर्धा रविवारी ९ नोव्हेंबर रोजी गोव्यात संपन्न झाली. या स्पर्धेत कुडाळ-पावशी येथील प्रमोद भोगटे यांनी ४५ ते ४९ या वयोगटातुन हि स्पर्धा पूर्ण करून इतिहास घडविला. याबद्दल माहिती देण्यासाठी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉ. बापू परब, प्रथमेश सावंत, रोहन कोरगावकर, केदार भाट, सचिन मदने उपस्थित होते.
गजानन कांदळगावकर यांनी यावेळी या स्पर्धेविषयी माहिती देऊन या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या प्रमोद भोगटे यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये तीन खेळांचा समावेश आहे. त्यात १.९ किमी स्वामिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग यांचा समावेश होतो. या तीनही स्पर्धा साडेआठ तासांच्या आत पूर्ण करायच्या असतात. प्रमोद भोगटे यांनी हे अंतर दिलेल्या वेळेत म्हणजे ८ तास २५ मिनिटात पूर्ण करून इतिहास घडविला आहे. हि गोष्ट सिंधुदुर्गचा अभिमानस्पद आहे, असे गजानन कांदळगावकर म्हणाले. या स्पर्धेत अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. रविवारी झालेल्या स्पर्धेत कर्नाटकचे खासदार तेजस्वी सूर्या, , तामिळनाडूचे भाजप लीडर अण्णा मलाई, अभिनेता आमिर खानचा जावई सहभागी झाले होते. गेल्यावर्षी मिलिंद सोमण हे सुद्धा सहभागी झाले होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या स्पर्धेचं उदघाटन केल्याचे कांदळगावकर म्हणाले.
प्रमोद भोगटे यांनी स्पर्धेचा अनुभव कथन करताना हि स्पर्धा जिंकायची हे आपले स्वप्न होते. आज माझी स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या सीए कडून त्यांना या स्पर्धेची माहिती मिळाली. त्यांनतर त्यांनी कोल्हापूर येथील प्राशनाकडून ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केले. १० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी सरावला सुरुवात केली. दोन दिवस स्विमिंग, दोन दिवस सायकलिंग आणि दोन दिवस रनिंग असा त्यांचा सर्व सुरु झाला. त्यात डाएटचा सुद्धा समावेश होता. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ त्यांनी व्यर्ज्य केले. गेले दहा महिने त्यांचा अखंड सराव सुरु होतो.

पायात क्रॅम्प.. डोळ्यासमोर अंधार… तरीही जिद्द जिंकली

अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. सकाळी समुद्रात १.९ किमीची स्पर्धा सुरु झाली. नेहमी नदीत किना तळ्यात पोहणाऱ्या प्रमोद याना हा अनुभव नवीन होता.पोहून किनाऱ्याजवळ येताना पायात क्रॅम्प आले होते. तरी देखील त्यांनी दिलेल्या वेळेत पोहण्याची स्पर्धा पूर्ण केली. आता वेळ होती सायकलिंगची. गोव्याच्या त्या कडक उन्हात त्यांनी ९० किमी सायकलिंग अंतर पूर्ण केले. त्यावेळी पायात आलेल्या क्राम्पने त्यांची दमछाक झाली होती. त्यात रुपेश तेली आणि शिवप्रसाद राणे त्यांचा हुरूप वाढवत होते. प्रोत्साहन देत होते. सायकलिंग पूर्ण झाल्यावर २१ किमी रनिंग पूर्ण करायचे होते. पण पायात आलेल्या क्रॅम्पने हैराण झालेल्या प्रमोद यांच्या मानत शर्यत अर्धवट सोडावी का असा विचार येऊन लागला. पण रुपेश तेली आणि शिवप्रसाद राणे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. तू हे करू शकतोस असा विश्वास दिला आणि त्याही परिस्थितीत प्रमोद भोगटे यांनी ८ तास २५ मिनिटात अंतिम रेषा पार केली. त्यावेळी एका स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या आणि रुपेश व शिवप्रसाद यांच्या चेहऱ्यावर होता.

तरुणांनी खेळांकडे वळले पाहिजे – रुपेश तेली

प्रमोद भोगटे यांचे यश हे सिंधुदुर्गातील सर्व तरुणांना प्रेरणा देणारे आहे असे रुपेश तेली यानीस सांगितले. विशेषतः ४५ ते ४९ या वयोगटात ठराविक वेळेत स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग करून रेस पूर्ण करणे हे खायचे काम नाही. तरुणांनी यापासून प्रेरणा घेऊन फक्त मोबाईल मध्ये अडकून न राहता मैदानी खेळ सुद्धा खेळले पाहिजेत असे रुपेश तेली यांनी सांगितले. यावेळी त्यांनी डॆहील प्रमोद भोगटे यांच्योसोबतचा स्पर्धेचा अनुभव कथन केला.

error: Content is protected !!