जातीतून जातीच्या पलीकडे पाहायला नाईक मराठा मंडळाने शिकवली – अजय कांडर

कुडाळ मध्ये नाईक मराठा मंडळाचा शताब्दी पदार्पण सोहळा

स्व. डॉ. प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर स्व. बाबा आचरेकर पुरस्कार

केवळ आपल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यंचाच नव्हे तर गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे ज्या केळूस गावचे आहेत, त्या केळूस गावातील ज्ञातीबाहेरील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथे झाला. म्हणजेच जातीतून जातीच्या पलीकडे पाहणे हि गोष्ट नाईक मराठा मंडळाने जगाला शिकवली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक अजय कांडर यांनी काढले. नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्या शतक महोत्सव पदार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार स्व. डॉ. प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
नाईक मराठा मंडळ मुंबई या संस्थेने ९९ वर्ष पूर्ण करून यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात शताब्दी महोत्सव पदार्पण सोहळा, विद्यार्थी गुणगौरव आणि स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाभरातूनच नाही तर मुंबई पुण्यावरून देखील ज्ञाती बांधव उपस्थित होते. सुनील सांगेलकर यांनी घातलेल्या दणकेबाज गाऱ्हाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञातीतील लहानथोर मंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये ‘बयो’ फेम रुची नेरुरकर हिची कथ्थक गणेशवंदना, वंडरबॉय विजय तुळसकर याचे हार्मोनियमवरील रागदारी, राधा कृष्ण नृत्य, विठूचा गजर नृत्य, गवळण अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी शंभर वर्षांपूर्वी नाईक मराठा मंडळाची स्थापना केली. त्या केळुसकर गुरुजींची व्यक्तिरेखा किशोर नांदोस्कर यांनी साकारत तरुणांनी या ज्ञाती साठी पुढे यावे असे आवाहन केले. त्यांनतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उदघाटन कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते अजय कांडर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाईक मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर, चिटणीस किरण नाईक, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग देवळी हितवर्धक समाजचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, स्व. डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या पत्नी प्रज्ञा वालावलकर उपस्थित होते.
यावेळी स्व. मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव प्रदान आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत कै. डॉ. प्रमोद वालावलकर यांना मारणोत्तर प्रदान करण्यात आला. डॉ. वालावलकर यांच्या पत्नी प्रज्ञा वालावलकर यांनी अजय कांडर आणि सुनील सांगेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्यांनतर ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे ज्या केळूस गावचे आहेत, त्या केळूस गावातील ज्ञातीबाहेरील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. रेडी येथील चित्रा कनयाळकर आणि सिने सृष्टीतील कला दिग्दर्शक कुडाळचे सुपुत्र महेश कुडाळकर यांचा देखील ज्ञातिबांधव म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. या पारितोषिक वितरण सोहळयाचे सूत्रसंचालन विजय अणावकर यांनी केले.
यावेळी बोलताना कवी अजय कांडर यांनी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्याबद्दल गौरोवोद्गार काढले. गुरुवर्य केळुसकर हे समजला भूषण आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते गुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांचे चरित्र त्यांनी लिहिले. त्यांची माहिती समजतातीलच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला असणे आवश्यक असल्याचे कवी अजय कांडर यांनी सांगितले. केळुसकर गुरुजी आणि आपले नाते हे बौद्धिक नाते आहे. बौद्धिक नाते हे सर्वश्रेष्ठ असते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केळुसकर गुरुजी यांनी दाखवून दिले आहे. असे श्री. कांडर यांनी सांगितले.
साहित्यातील एक पुरस्कार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या नावाने दरवर्षी साहित्यिकाला दिला जाईल अशी घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सांगेलकर यांनी यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना केली. गुरुवर्य केळुसकर हे सर्व समाजाचे आहेत. त्याचे पोष्टाचे तिकीट तयार करावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचा पत्रव्यवहार सुरु आहे. नाईक मराठा मंडळाच्या शताब्दी वर्षातच ते तिकीट प्रकाशित व्हावे अशी मागणी श्री. सांगेलकर यांनी केली. त्याचबरोबर इंदूमिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात गुरुवर्य केळुसकर यांना त्याचे गुरु म्हणून स्थान मिळावे अशी मागणी श्री. सांगेलकर यांनी यावेळी केली.
यावेळी राजन नाईक यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे डॉक्टर होते. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून ते रुग्णसेवा करत होते. कुडाळचे महिला रुग्णालय हे त्यांच्यामुळेच सुरु झाले असल्याचे राजन नाईक यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय चिटणीस किरण नाईक यांनी करून दिला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सुनील सांगेलकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम याचे सूत्रसंचालन अदिती नांदोसकर हिने केले तर आभारप्रदर्शन राजश्री कबरे यांनी केले. कार्यक्रमाला नाईक मराठा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!