कणकवलीत “त्या” नेत्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!

नुकतीच कणकवली बैठक घेत कार्यकर्त्यांच्या मतांची चाचपणी

लवकरच भूमिका स्पष्ट करण्याचा “त्या” नेत्याचा कार्यकर्त्यांना “संदेश”

“जैसे थे” स्थिती राहणार की सत्ताधारी पक्षाची वाट धरणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

कणकवली नगरपंचायत ची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेली असताना कणकवलीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदललेले असतानाच आता पुन्हा एकदा कणकवलीच्या राजकीय घडामोडींवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका जिल्हास्तरीय नेत्याने आपल्या निवासस्थानी नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक घेत आपले खास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून मते आजमावून घेतली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीची यावेळी चाचपणी देखील झाल्याचे समजते. या दरम्यान काहींकडून सत्ताधारी तर काहींकडून जैसे थे स्थितीचे मत आल्याने लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र ती भूमिका काय असणार? ते तूर्तास गुलदस्त्यात आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या असलेल्या पक्षासोबतच अन्य एका सत्ताधारी पक्षाकडून नगराध्यक्ष पदा करिता या नेत्याला ऑफर असल्याची चर्चा आहे. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत होऊ घातलेल्या संभाव्य कणकवली शहर विकास आघाडीचे नेतृत्व करायचे? की आहे त्या ठिकाणाहूनच ताकद आजमावायची? की अन्य कोणता पर्याय स्वीकारायचा या अनुषंगाने देखील चाचणी या बैठकीमध्ये करण्यात आल्याचे समजते. यावर बहुतांशी कार्यकर्त्यांनी “तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासोबत आम्ही आहोत” अशी भूमिका घेतल्याची समजते. गेले काही दिवस या जिल्हास्तरीय नेत्याच्या संभाव्य भाजपा पक्षप्रवेशाबाबत जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू असताना याबाबत मात्र या नेत्याने याबाबत कोणताही स्पष्ट “संदेश” दिलेला नाही. त्यामुळे या घडामोडींची उत्सुकता आता वाढली आहे. दरम्यान या नेत्या भोवती गेले काही वर्ष असलेले राजकीय वलय पाहता या नेत्याच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचा आग्रह हा सत्ताधारी पक्षाचा असाच असावा अशा अनुषंगानेच “त्या” नेत्याच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान सत्ताधारी पक्षातील दोन्ही ठिकाणी या नेत्याच्या नावाच्या पक्षप्रवेशाचा “संदेश” चर्चेत असला तरी अजून निर्णायक भूमिका ठरलेली नाही. त्यातच सत्ताधारी प्रमुख पक्षाकडून तूर्तास तरी नगराध्यक्ष पदाकरता हिरवा कंदील नसल्याचे समजते. या नेत्याचा प्रमुख सत्ताधारी पक्षात पक्ष प्रवेश घेण्यासाठी काही मोजके माजी लोकप्रतिनिधी वगळता “त्या” पक्षातील उर्वरित माजी प्रमुख लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचे समजते. मात्र हा विरोध मान्य केला जाणार की? पक्षीय पातळीवर राज्यस्तरीय मित्रत्वाचे संबंध असलेले नेतृत्व व हिंदुत्वाचा चेहरा असलेले नेतृत्व हा संभाव्य चर्चेत असलेला पक्षप्रवेश करून घेणार? तसेच त्या नेत्याच्या नगराध्यक्ष उमेदवारी सह अन्य प्रमुख मागण्या पूर्ण होणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या नेत्याला सध्या असलेल्या पक्षाकडून नेतृत्व करण्यासाठी व पुरेसे “बळ” दिले जाण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या गोटामध्ये आहे. विधानसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने व तशी स्पष्ट नाराजी देखील या नेत्याने काही वेळा बोलून दाखवल्याने आता सत्ताधारी दोन पैकी नेमका कोण? की जैसे थे हा निर्णय घेण्याची अधिकार कार्यकर्ते व समर्थकांनी या नेत्याला दिल्याचे समजते. त्यामुळे आता हा जिल्हास्तरीय नेता हाती धनुष्य घेत कणकवलीच्या नगराध्यक्षपदी निवडणूक लढवणार? जैसे थे स्थितीत राहून लढाई लढणार? की अर्जुन बनून कमळाची साथ घेणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. एकूणच या नेत्याच्या निर्णायक भूमिकेनंतर कणकवलीतील काही राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून कणकवलीत “या” नेत्याच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!