सोनवडे-घोटगे घाटमार्गाची आयआयटी संस्थेकडून तांत्रिक तपासणी

अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही
एप्रिल महिन्यानंतरच थेट काम सुरू होण्याची शक्यता
सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) पाहणी नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालनंतर केंद्रीय वन्य जीव समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या दोन संस्थांचा सकारात्मक अहवाल आणि इतर बाबींची पूर्तता झाल्यानंतरच घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी अजून किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. एप्रिल २०२६ नंतरच निविदा पूर्ण होऊन घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
सन १९८० च्या सुमारास कै.प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्यासह सोनवडे, जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांनी सोनवडे घाटमार्गासाठी आंदोलने सुरू केली. तर १९८५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री एस. एन. देसाई यांनी या घाटमार्गाला राज्य शासनाकडून मान्यता मिळवून दिली. त्यानंतर १९९० मध्ये या घाटमार्गासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्यकाळात सोनवडे घाट मार्गासाठी पर्यायी वनजमिनीची उपलब्धता करून या घाटमार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर केला. तर सन २०२१ मध्ये घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामासाठी निविदाही मंजूूर करण्यात आली.
सानेवडे घाट रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करताना मात्र घाटमार्गाची अलायमेंट चुकीची असल्याची बाब निष्पन्न झाली. त्या अलायमेंटनुसार रस्ता केल्यास केवळ हलकी वाहने घाटमार्गातून जाऊ शकतील, अवजड वाहने जाणार नसल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे सोनवडे घाट मार्गाची नव्याने आखणी करण्याचे राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आले.
सन २०२१ या घाटमार्गासाठी मोनार्ज सर्व्हेअर्स आणि इंजीनिअरिंग पुणे या कंपनीने घाटमार्गाचा सर्वे केला होता. त्यानंतर सन २०२२ आणि २०२३ मध्ये याच कंपनीकडून सर्व प्रकारची वाहने जाऊ शकतील अशा पाच पर्यायी रस्त्याचा सर्वे करून तो शासनाकडे सादर करण्यात आला. यात घाट मार्गाची लांबी १० किलोमिटर वरून १३.३४ किलोमिटर अशी झाली. तसेच ६ किलोमिटर रस्त्यासाठी खासगी जागा संपादन करणे आवश्यक झाले.
सोनवडे घाटमार्गाची नवीन अलायमेंट तयार झाल्यानंतर नवी दिल्ली येथील वन्यजीव मंडळ, व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरण विभाग यांच्या परवानगी आवश्यक ठरल्या. त्यासाठी या मंडळांचे पथक तसेच सार्वजनिक बांधकाम कणकवली आणि राधानगरी येथील अधिकाऱ्यांनी जानेवारी आणि मार्च २०२५ मध्ये या घाटमार्गाची पाहणी केली. यात मोनार्च कंपनीने घाट मार्गासाठी सुचविलेल्या पाच पर्यायांपैकी कमी चढण असलेला प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने स्वीकारला. तर या निवडलेल्या घाट मार्गाची आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी अट वन्यजीव मंडळाने घातली. त्यानुसार २८ सप्टेंबरला आयआयटी संस्थेच्या पथकाने पायी चालत सोनवडे, घोटगे आणि जांभळगाव या गावातून जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. ही समिती ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आपला अहवाल बांधकाम आणि वन्य जीव मंडळाला देणार आहे. तर या अहवालाच्या आधारावर वन्य जीव मंडळ आपला अहवाल बांधकामाला सादर करणार आहे.
या दोन संस्थांच्या अहवालानंतर, भूसंपादन पूर्ण करणे, अन्य परवानग्या शिल्लक असल्यास त्याची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव वनविभागाला सादर केला जाणार आहे. वनविभागाने घाट रस्ता कामासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर या रस्ता कामाच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतरच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
सोनवडे-घोटगे घाटमार्गाबाबत आयआयटी मुंबई, वन्यजीव मंडळ नवी दिल्ली आणि वनविभाग यांच्याकडून सकारात्मक अहवाल येणे, त्यानंतर खासगी क्षेत्रातील ६ किलोमिटर रस्त्याच्या जागेचे भू संपादन आदी कामांसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतरच रस्त्याच्या निविदा काढल्या जातील आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ नंतरच घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.





